astik kumar panday news
astik kumar panday news 
छत्रपती संभाजीनगर

कामात हलगर्जी; एक निलंबित, तिघांचे पगार रोखले, सातजणांना नोटीस

माधव इतबारे

औरंगाबाद ः लॉकडाउनमुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे, त्यामुळे लॉकडाउन शिथिल होताच महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी त्यांनी अचानक वॉर्ड कार्यालयांना भेटी देत वसुलीचे रेकॉर्ड आणा, असे फर्मान संबंधित कर्मचाऱ्यांना सोडले.  मालमत्तधारकांना मागणीपत्रच पाठवण्यात आले नसल्याचे यावेळी समोर आले. त्यामुळे संतापलेल्या प्रशासकांनी एकाला निलंबित करण्याचे आदेश देत तीनजणांचे वेतन थांबवले, तर सातजणांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्याच्या सूचना केल्या.

मालमत्ता करवसुलीची मोहीम १५ ऑगस्टनंतर हाती घेण्याचा निर्णय पांडेय यांनी घेतला आहे. बुधवारी त्यांनी सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत अधिकाऱ्यांना सोबत घेत प्रभाग तीन ते सात अशा पाच कार्यालयांना भेटी देत वसुली कर्मचाऱ्यांची झडती घेतली. यावेळी वसुलीच्या रेकॉर्डची मागणी त्यांनी कर्मचाऱ्यांकडे केली. अचानक आणि तेही प्रशासक समोर थांबून रेकॉर्ड मागत असल्याने कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. अनेकांना माहितीही देता आली नाही. तर काहींजवळ डिमांड नोट तशाच पडून होत्या.

ऑगस्ट महिना उजाडून बारा दिवस उलटून गेले तरी डिमांड नोट मालमत्ताधराकांना पोचल्या नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता सातजणांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्याचे आदेश दिले. तर तीन जणांचे वेतन थांबविण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.

जोपर्यंत कामात सुधारणा होत नाही तोपर्यंत, वेतन देऊ नका, असा आक्रमक पावित्रा पांडेय यांनी घेतला. आढावा घेताना विजय दाभाडे यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वसुलीच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमही पांडेय यांनी यावेळी भरला. 

 वॉर्ड कार्यालयांमध्ये कर्मचारी-अधिकाऱ्यांना सोयीसुविधा आहेत का? याची पाहणी करण्यासाठी बुधवारी प्रशासकांनी अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी वसुलीचा आढावा देखील घेतला. ज्यांचे काम समाधानकारक नाही, त्यांना नोटिसा बजाविण्याचे व काहींचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले असल्याचे कर निर्धारक व संकलक नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.
 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT