छत्रपती संभाजीनगर

पोरं त्यांना झाली...मांडीवर आम्ही खेळवतोय...; नितीन गडकरी यांची टीका

हरी तुगावकर

लातूर : "राज्यातील पाण्याची समस्या ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे. त्यांनी सिंचनात मोठा भ्रष्टाचार केला. त्यातून पंधरा वर्षापासून अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माझ्या खात्याकडून ४० हजार कोटी रुपये दिले आहेत. लग्न
भलत्याचच झालं. पोरं त्यांना झाली. या पोरांना मांडीवर बसवून खेळवण्याची जबबादारी मुख्यमंत्री फडणवीस व माझ्यावर आली. अशी ही सिंचन प्रकल्पाची अवस्था आहे. ही जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. म्हणूनच हा निधी दिला आहे. हा निधी म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्म्याला दिलेली श्रद्धांजली आहे," अशी टीका केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केली.

लातूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. १५) झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, आमदार सुधाकर भालेराव उपस्थित होते. मराठवाड्याचे वाळवंट होत आहे. "आम्ही आता नद्या जोड प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यात दबडगंगा पिंजर आणि तापी नार नर्मदा हे दोन प्रकल्प हाती घेतले आहेत. पहिल्या प्रकल्पावर धरण बांधून त्यातील पाणी गोदावरील सोडले जाणार आहे. यातून ते जायकवाडी प्रकल्पात आणले जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. मराठवाडयाला वाळवंट नव्हे तर कॅलिफोर्निया केल्याशिवाय मी राहणार नाही," असा विश्वास  गडकरी यांनी यावेळी लातूरकरांना दिला.

"गेल्या साठ वर्षात जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग झाला नव्हता. आता नऊ हजार कोटी रुपये खर्च करून पाच राष्ट्रीय महामार्ग होत आहेत. पाणी ही जिल्ह्याची समस्या आहे. ती गडकरी यांनी सोडवावी. लातूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा आहे," असा विश्वास पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT