No Leaders Turned up for Meeting Called by Prashant Bamb 
छत्रपती संभाजीनगर

आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नांवर 'पाणी'

भाजप आमदार प्रशांत बंब यांनी बोलावलेल्या मराठवाडा पाणी प्रश्‍नाच्या बैठकीकडे अपेक्षेप्रमाणे पुन्हा एका आमदार, खासदार लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. बंब यांनी या आधीही पाणी प्रश्‍नावर लोकप्रतिनिधींना एकत्र आणून एक मोठा दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही

जगदीश पानसरे

औरंगाबादः भाजप आमदार प्रशांत बंब यांनी बोलावलेल्या मराठवाडा पाणी प्रश्‍नाच्या बैठकीकडे अपेक्षेप्रमाणे पुन्हा एका आमदार, खासदार लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. बंब यांनी या आधीही पाणी प्रश्‍नावर लोकप्रतिनिधींना एकत्र आणून एक मोठा दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. औरंगाबादेतील कालच्या बैठकीत भाजपच्याच आमदारांची सर्वाधिक उपस्थिती होती, त्यामुळे मराठवाड्यातील पाणी प्रश्‍न हा फक्‍त एका पक्षा पुरता मर्यादित राहिला आहे का? असा प्रश्‍न पडतो.

पंकजा मुंडे यांच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला गर्दी झाली, पण ठोस उपाय योजनांचा प्रस्ताव मांडून तो सरकार दरबारी ठेवण्यासाठी महत्वाच्या बैठकीकडे मात्र लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत. त्यामुळे प्रशांत बंब यांच्या प्रयत्नांवर पुन्हा एकदा पाणी फिरले असेच म्हणावे लागेल. अभ्यासपुर्ण मांडणी, आक्रमकपणा या स्वभाव गुणांमुळे प्रशांत बंब ओळखले जातात. समन्यायी पाणी वाटप आणइ मराठवाड्याच्या हक्काचे पाणी हा त्यांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. गेल्या अनेक वर्षांपासून बंब पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांशी मराठवाड्याच्या पाण्यासाठी भांडत आहेत. अगदी त्यांनी उभारलेल्या कायदेशीर लढाईमुळेच समन्यायी पाणी वाटपावर सरकारला ठोस भूमिका घेणे भाग पडले.

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पश्‍चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी अतिरक्त धरणं बांधून अडवल्याचा आरोप करत ती कॅप्सूल बॉम्बने उडवून द्या अशी विखारी मागणी केल्यामुळे तेव्हा आमदार बंब राज्यभरात प्रकाशझोतात आले होते. एवढे असूनही मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना या प्रश्‍नावर एकत्र आणण्यात मात्र त्यांना अद्यापपर्यंत यश आलेले नाही.

बंब यांच्यावर भरवसा नाही?

आमदार प्रशांत बंब हे गंगापूर- खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळी निवडूण आलेले आहे. पैकी एकदा अपक्ष तर गेल्या दोन निवडणुका ते भाजपच्या तिकीटावर लढले. बंब यांची कार्यपध्दती नेहमीच वादातीत राहिले आहे. रस्ते, पूल, पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन हे त्यांचे आवडतीचे विषय. त्यामुळे या कामांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते.  अगदी आपल्याच मतदारसंघात नाही तर राज्यभरात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांवर ते लक्ष ठेवून असतात.

यामागे जनतेच्या पैशाची लूट होऊ नये, कंत्राटदारांना पाठीशी घातले जाऊ नये आणि काम उत्कृष्टच झाले पाहिजे असा आपला हेतू असल्याचे बंब वारंवार सांगतात. पण नेमका त्यांचा हा हस्तक्षेपच मराठवाडा व राज्यातील लोकप्रतिनिधींना खूपतो आणि ते एखाद्या चांगल्या कामासाठी देखील बंब यांच्या पाठीशी उभे राहायला धजावत नाही हे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

राज्यात फडणवीस सरकार सत्तेत असतांना प्रशांत बंब यांनी आपल्याच पक्षाचे तत्कालीन सार्वजिनक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर गेल्यावर्षी मुंबईत झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात बंब यांच्या विरोधात राज्यातील बऱ्याच सर्वपक्षीय आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि प्रशांत बंब यांच्यात सध्या सुरू असलेला वाद आणि त्यातून बंब यांनी मानहानीचा दावा दाखल करण्याची त्यांना पाठवलेली नोटीस हे त्याचे ताजे उदाहरण.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर यापुर्वी आपण पाचवेळा लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही असे बंब सांगतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत पुन्हा एकदा पाण्याच्या प्रश्‍नाला हात घातला.  पंकजा यांचे राजकीय वजन पाहता त्यांच्या उपोषणाला मराठवाड्यातील बऱ्याच लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली होती. त्यानंतर आठवडाभरातच बंब यांनी देखील पुन्हा याच प्रश्‍नावर बैठकीचा घाट घातला. भाजपचे आमदार वगळता, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी या बैठकीला दांडी मारली.

आता या आमदार, खासदारांना मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नाशी काही देणेघेणे नाही असा आरोप हाते आहे. परंतु या लोकप्रतिनिधींचा आमदार प्रशांत बंब यांच्यावर विश्‍वास नसल्यामुळेच एका महत्वाच्या मुद्यावर पुन्हा एकदा पाणी फिरले एवढे मात्र निश्‍चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT