Rana-Jagjitsinh-patil
Rana-Jagjitsinh-patil 
छत्रपती संभाजीनगर

राणा जगजितसिंह यांनी उस्मानाबाद पंचायत समिती भाजपच्या दावणीला बांधली 

सरकारनामा

उस्मानाबाद :  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने उस्मानाबाद पंचायत समितीत पहिल्यांदाच भाजपच्या ताब्यात गेली आहे. सभापतिपदी भाजपच्या हेमा चांगणे यांची, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे (आमदार राणाजगजितसिंह पाटील समर्थक) संजय लोखंडे यांची निवड झाली आहे. दरम्यान, निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली.


उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. एकूण 24 सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे 16, शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन, तर दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत. दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वच सदस्य आमदार पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जात आहेत. त्याचा प्रत्यय मंगळवारी (ता. 31) आला. 


पंचायत समिती सभागृहात झालेल्या सभेत सभापतिपदासाठी भाजपकडून हेमा चांदणे (केशेगाव गण), तर शिवसेनेकडून कुसुम इंगळे (चिखली गण) यांनी अर्ज भरला. यामध्ये चांदणे यांना राष्ट्रवादीची 16 पैकी 15, भाजपचे तीन अशी एकूण 18 मते मिळाली. तर इंगळे यांना शिवसेनेची तीन आणि कॉंग्रेसची दोन अशी पाच मते मिळाली. राष्ट्रवादीचे पळसप गणातील सदस्य शाहुराज पाटील हे तटस्थ राहिले. त्यामुळे चांदणे या 18 विरुद्ध पाच मतांनी विजयी झाल्या.


 उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे संजय लोखंडे आणि शिवसेनेच्या संग्राम देशमुख यांच्यात लढत झाली. येथेही लोखंडे यांना 18 मते मिळाली. ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या 15 आणि भाजपच्या तीन सदस्यांनी लोखंडे यांच्या बाजूने मतदान केले. तर देशमुख यांना शिवसेनेची तीन आणि कॉंग्रेसची दोन अशी पाच मते मिळाली. त्यामुळे उपसभापतिपदाची माळ लोखंडे यांच्या गळ्यात पडली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार गणेश माळी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी काम पाहिले.



सभापतिपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. राष्ट्रवादीचे 16 सदस्य आहेत. यामध्ये एकही अनुसूचित जातीची महिला नाही. तर भाजपकडे एक अनुसूचित जातीची महिला हेमा चांदणे या केशेगाव गणातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या चांदणे यांना सभापतिपदाची लॉटरी लागली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT