Sanjay Bansode Felicitated After Becoming Minister
Sanjay Bansode Felicitated After Becoming Minister 
छत्रपती संभाजीनगर

मंत्री झालो म्हणून रुबाब करणार नाही - संजय बनसोडे

सुशांत सांगवे

लातूर : मंत्री झालो म्हणून कधी रुबाब करणार नाही. गर्वातही येणार नाही. आधीचा मी आणि आताचा मी एकच असेल. त्यामुळे 'हक्काचा माणूस' समजून माझ्याकडे कधीही या. तुमचे प्रश्न सोडविण्याचा मी सदैव प्रयत्न करेन... अशा शब्दांत संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. राखीव मतदारसंघातून आलेला माणूस सामाजिक न्याय मंत्री होतो. मात्र, आता तसे झाले नाही. राज्याला पाणी पुरवठा करण्यापासून सहा महत्वाची खाती माझ्याकडे आली आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल बनसोडे यांना मानपत्र, फेटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र देऊन आंबेडकरी जनतेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि तुतारीचा निनाद करण्यात आला. रामराव गवळी, मकरंद सावे, श्रीहरी कांबळे, केशव कांबळे, चंद्रकांत चिट्टे, मोहन माने, संजय सोनकांबळे, अनिल गायकवाड, अशोक कांबळे, अनिल शिंदे, अरविंद कांबळे याप्रसंगी उपस्थित होते.

बनसोडे म्हणाले, पाच टर्म निवडून येऊनही अनेकजण मंत्री होत नाहीत. मात्र, पहिल्यांदाच निवडून आलेल्या माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री केले. अशी किमया केवळ तेच दाखवू शकतात. मी मंत्री झालो असलो तरी अनेकदा पायी, तर कधी दुचाकीवरून या भागात फिरलो आहे. कारण मी तुमच्यातीलच एक, सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे माझ्याकडे येताना आपला माणूस समजून या. हक्काने माझ्याकडे प्रश्न मांडा.

लातूर शहराचा पूर्व भाग विकासापासून वंचित आहे. मी उदगीरचा असलो तरी या भागाकडे माझे तितकेच लक्ष राहील. कारण या भागात मी राहिलो आहे. लातूरच्या पाण्याबाबत नुकतीच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. उजनी धरणातील पाणी लातुरात आणले तर लातूरचा प्रश्न सुटेल. असा विचार या बैठकीत मांडण्यात आला. त्यामुळे याबाबतचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचे काम सुरू झाले आहे, असे बनसोडे यांनी सांगितले.

हे क्षण कधी विसरणार नाही

याआधी 2014मध्ये झालेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला. त्यावेळी वेगळी लाट होती. पराभव झाला म्हणून निराश झालो नाही. अधिक जोमाने कामाला लागलो. सर्व समाजातील लोकांच्या मदतीसाठी धावून गेलो. कामांच्या माध्यमातून मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवला. त्यामुळेच भरघोस मतांनी निवडून आलो. प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख हे दोन दिवस उदगीरमध्ये आले. त्यांनी जाहीर भाषणात सांगितले, 'इथे केवळ संजय नाही मीही निवडणुकीत उभा आहे.' त्यांचे वाक्य ऐकून भारावून गेलो. असेच बळ अमित देशमुख यांनीही दिले. हे क्षण मी कधीही विसरणार नाही, अशी भावना बनसोडे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT