Sanjay Daund May Get Council Ticket Through Sharad Pawar
Sanjay Daund May Get Council Ticket Through Sharad Pawar 
छत्रपती संभाजीनगर

शरद पवारांमुळे राष्ट्रवादीचा वाटा काँग्रेसच्या संजय दौंड यांच्या पदरात पडणार  

दत्ता देशमुख

बीड : राष्ट्रवादीने आपला वाटा जिल्ह्यातील काँग्रेसला देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे विधानसभेला विजयी झाल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे संजय दौंड यांची उमेदवारी निश्चित असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीवेळी खुद्द शरद पवार व अजित पवार यांनी दौंड यांना शब्द दिला होता.

मागच्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पराभूत झालेल्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेवर घेत विरोधी पक्षनतेपद दिले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी खुद्द पवार चुलते - पुतण्यांनी संजय दौंड यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता. त्यानंतर माजी मंत्री पंडितराव दौंड व संजय दौंड धनंजय मुंडे यांच्या प्रचारात आघाडीवर होते. आता धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणुक होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत वाय. बी. सेंटला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. त्यातही पवारांनी दौंड यांच्या उमेदवारीचे संकेत आपल्या मंत्र्यांना दिले. 

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे दावेदार मानले जात होते. मात्र, ही आमदारकी पूर्ण कालावधीची नसल्याने अमरसिंह पंडित फारसे इच्छुक नव्हते. तर, खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विरोधात निवडणुक लढल्याने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे देखील इच्छुक होते. परंतु, दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची पक्षाने त्यांना संधी दिली. त्यातच खुद्द पवारांनी दौंड यांना शब्द दिल्याने इतर कोणी यासाठी लॉबींगही केले नव्हते.

दौंड काँग्रेसचे असले तरी दौंड - पवार कुटुंबियांचे जुने राजकीय ऋणानुबंध आहेत. त्यांचे वडिल पंडितराव दौंड हे मंत्री होते. काही कारणाने त्यांना अल्पकाळच मंत्रीपदावर काम करता आले. त्यामुळे राष्ट्रवादीचा वाटा शरद पवारांमुळे काँग्रेसच्या दौंड यांना मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT