omprakash shete cry new
omprakash shete cry new 
छत्रपती संभाजीनगर

गरीब मरतायेत त्यांना वाचवा.. मुख्यमंत्री सहायता निधी माजी प्रमुख ढसाढसा रडला..

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः राज्यातील गोर-गरीब रुग्णांच्या दुर्धर आजारावर उपाचर करता यावेत यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष नावाच एक मंदीर उभारण्यात आले होते. ते आता कोसळे आहे, पैशा अभावी गरिबांना उपाचर मिळत नाहीयेत, ते मरतायेत. मी मुख्यमंत्री सहायता कक्षाचा प्रमुख राहिलेलो आहे, आम्ही १७ लाख लोकांना मदत केली होती. आजही मदतीसाठी मला रोज सहाशेहून अधिक मेसेज येतात. त्यांना उत्तर देता देता मी थकलोय, अशा शब्दांत युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख राहिलेले ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरकारकडून अपेक्षा नसल्याने मी न्यायालयात गेलो आहे, कोर्टानेच आता यातील तांत्रिक बाबी दूर करून गरिबांना वाचवावे असे आवाहन करतांना शेटे अक्षरशः ढसाढसा रडले.

याआधीच्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात राज्यातील गोर-गरीब रुग्णांना त्यांच्या आजारावरील खर्चिक उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मंत्रालयात स्थापन करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामी विशेष लक्ष देत निधीही उपलब्ध करून दिला. ओमप्रकाश शेटे यांची कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या सहायता निधाच्या माध्यमातून राज्यातील गोर-गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देखील झाली होती. परंतु राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आले. परंतु मुख्यमंत्री सहायता निधीचे काम आणि त्यातून होणारी मदत पुर्णपणे ठप्प झाली.

गेल्या सहा-सात महिन्यापासून राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे, देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळे असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडी सरकार कोरोनाशी लढा देऊन जनतेचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याची टिका केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी देखील सरकारवर टिका करत पैशा अभावी लोकांचे प्राण जात असल्याचे आरोप करत थेट न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून यात शेटे हे ढसाढसा रडतांना दिसले.

या व्हिडिओत राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे कसे दुर्लक्ष होत आहे याकडे शेटे यांनी लक्ष वेधले. शेटे म्हणाले, सर्वसामान्य व्यक्तीला आजारावर उपचार घेता यावेत, त्याच्यावर शस्त्रक्रिया, औषधोपचारासाठी सरकारकडून मदत मिळावी या हेतूने आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष नावाचे मंदीर उभारले होते. आज ते मंदीर कोसळले आहे, पैशा अभावी लोक मरतायेत. त्यांना उपचार मिळत नाहीये, सरकारकडून कुठलीच मदत मिळत नाहीये. आम्ही १७ लाख लोकांना मदत केली होती. मी या कक्षाचा प्रमुख म्हणून काम केलेले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना या निधीची किती मदत होत होती याची मला जाणीव आहे.

सहायता निधी वापरण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत, ते अधिकार कसे वापरायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्यावर मी अधिक बोलणार नाही. पण लोकांना मदत मिळत नाहीये, ते मरतायेत ही वस्तुस्थिती आहे. सरकारकडून अपेक्षा नसल्यानेच मी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनाच आता यातील तांत्रिक बाबी दूर करून गरीबांना न्याय द्यावा, असे आवाहन शेटे यांनी केले. यावेळी त्यांच्या भावनांचा बांध फुटला आणि ते ढसाढसा रडले. लोक मरतायेत याचे मला खूप वाईट वाटते, मला झोप लागत नाही. या गरीबांना वाचवा ही माझी आर्तहाक आहे, मनातील आवाज असल्याचेही शेटे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT