Uddhav Thakray Meets Rain Affected Farmers in Nanded
Uddhav Thakray Meets Rain Affected Farmers in Nanded 
छत्रपती संभाजीनगर

उध्दवसाहेब शेतकऱ्यांना जगवा -   जानापूरीच्या शेतकऱ्यांचा टाहो

प्रल्हाद कांबळे

नांदेड : गेल्या पंधरा दिवसात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवारी (ता. पाच) नांदेड जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी जानापूरी (ता. लोहा) येथील शेतीवर जावून पहाणी केली. यावेळी 'उध्दव साहेब शेतककऱ्यांना जगवा,' असा टाहो शेतककऱ्यांनी फोडला.  

गेल्या पंधरा दिवसात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजही शेतात गुडघाभर पाणी असून, पिकावर बुरशी चढली आहे. या भयावह परिस्थितीत शेतकरी हैराण झाला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नांदेडला आले आहेत. सकाळी दहा वाजता त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते विश्रांती न घेता थेट जानापूरी (ता. लोहा) येथील शेतककऱ्यांच्या बांधावर गेले. तेथे शेतककऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. मी आपल्या सोबत आहे असा विश्‍वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. 

यावेळी शेतकऱ्यांना जगवा असा टाहो, शेतकऱ्यांनी फोडला. यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु तराळले. आमचे आपणच मालक आहात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यानंतर ते लोहाकडे रवाना झाले. या तालुक्यातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष शेतात जावून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा आणि त्यांना धीर देण्यासाठी ते संबोधित करित आहेत. त्यानंतर ते कंधार तालुक्यात जातील आणि तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते अहमदपूरकडे रवाना होतील.

रविवारी (ता. दोन) जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्ह्यातील एकूण वीस गावांना भेटी देवून शेतीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येत्या पाच दिवसात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी येत असल्याने सर्व शिवसैनिकांनी नांदेड विमानतळावर गर्दी केली होती.  

उध्दव ठाकरे यांच्या समवेत सार्वजनीक  बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT