Shivsena News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद थांबता थाबंत नाहीये. दोघांकडून एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट-जंजाळ वादावर योग्य उपचार करण्याची जबाबदारी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली, पण त्यांनी अजून यात लक्षच घातले नाही.
दरम्यान, राजेंद्र जंजाळ माजी नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांनासोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरावर आहेत. जंजाळ जाणार हे गृहित धरून पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही जिल्हाप्रमुख म्हणून त्यांचा उत्तराधिकारी शोधला आहे. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडेही जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे समजते. याची कुणकुण लागल्यानंतर जंजाळ यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
पालकमंत्री संजय शिरसाट यांची निवडणुक आता संपली आहे, त्यांना कोणाची गरज नाही? ते मालक आहेत, त्यामुळे कोणाचीही नियुक्ती करू शकतात, असा टोला जंजाळ यांनी लगावला आहे.
काही दिवसांपुर्वी राजेंद्र जंजाळ यांनी एकनाथ शिंदे यांची चिकलठाणा विमानतळावर भेट घेतली होती. मंत्री संजय शिरसाट यांची एकूणच कार्यपद्धती, संघटनात्मक निर्णय घेतांना विश्वासात न घेणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे संकट काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी शिंदे यांच्याकडे व्यक्त केली होती. यावर श्रीकांत शिंदे हे या सगळ्याचा आढावा घेतील, त्यानंतर ठरवू असे जंजाळ यांना त्यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, आठवडा उलटला तरी एकनाथ शिंदेंनी या वादावर तोडगा काढला नाही, किंवा डाॅ. श्रीकांत शिंदे यांनीही कसलाही आढावा घेतलेला नाही. उलट राजेंद्र जंजाळ यांना हटवून त्यांच्या जागी नवा जिल्हाप्रमुख नेमण्याच्या हालचाली पक्षात सुरू झाल्याने संजय शिरसाट यांनी सांगितल्याप्रमाणे 'कुठे जायचे तिकडे जा' हा इशारा खरा ठरू पाहत आहे. जंजाळ यांनाही याची चाहूल लागल्यामुळेच त्यांचाही भाजपमधील प्रवेश निश्चित समजला जात आहे. तुपे यांना जिल्हाप्रमुख करण्यात येणार म्हटल्यावर जंजाळ यांनी एका वृतपत्रात दिलेल्या प्रतिक्रियेतून त्र्यंबक तुपे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
पक्षाचे सहसंपर्कप्रमुख असलेल्या तुपे यांच्या फुलंब्रीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि तीन नगरसेवक पदाचे उमेदवार भाजपमध्ये गेले. या कर्तृत्वाचे बक्षिस म्हणून पालकमंत्री त्यांना जिल्हाप्रमुख करत असतील, असा टोला जंजाळ यांनी लगावला. तर यावर पलटवार करतांना जंजाळ यांच्या सांगण्यावरूनच फुलंब्रीतील नगराध्यक्ष पदाचा आणि तीन नगरसेवक पदाचे उमेदवार भाजपमध्ये गेले नाही ना? अशी शंका उपस्थित करत आपल्याविरोधात त्यांचेच हे कट कारस्थान असल्याचा पलटवार केला. आता जंजाळ यांचा भाजप (BJP) प्रवेश आणि त्र्यंबक तुपे यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी कधी येते? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.