Ambadas_Danve
Ambadas_Danve 
छत्रपती संभाजीनगर

शिवसेनेचे आमदार रिलॅक्‍स, कसलही टेन्शन  नाही :  अंबादास दानवे

जगदीश पानसरे

औरंगाबादः राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेला संघर्ष, राज्यपालांनी शिवसेनेला मुदतवाढ देण्यास दिलेला नकार आणि लागू झालेली राष्ट्रपती राजवट अशा वातावरणातही शिवसेनेचे आमदार रिलॅक्‍स आहेत, कसलंही टेन्शन नाही, येत्या काही दिवसात शिवसेनेचा मुख्यमंत्रीही होणारच असा विश्‍वास शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी खेळ सुरू होता. एकाही पक्षाला सत्ता स्थापन करता न आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी असलेल्या शिवसेना आमदारांची स्थिती कशी होती? या संदर्भात आमदार अंबादास दानवे यांच्याशी सरकारनामा प्रतिनिधीने संपर्क साधला.

अंबादास दानवे म्हणाले, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करत होते. शिवसेनेच्या सर्व आमदरांचा मुक्काम मुंबईतील एका हॉटेलात आहे, अजून तीन-चार दिवस तरी सगळे आमदार मुंबईतच राहण्याची शक्‍यता आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा कुठलाही ताण किंवा टेन्शंन आमदारांवर नाही, उलट सगळे रिलॅक्‍स आहेत, हसत-खेळत सर्व परिस्थीतीचा आढावा घेत आहेत.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेचे इतर नेते देखील सातत्याने आमच्या संपर्कात आहेत, मार्गदर्शन करतायेत, त्यामुळे आमदारांवर कसल्याही प्रकारचे दडपण नाही. मी आज सकाळीच शहरात आलो होतो, पण पुन्हा तातडीने बोलावणे आल्यामुळे मुंबईला जाणार असल्याचेही अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच..

राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे सरकार स्थापन होणार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार याचा पुनरुच्चार देखील दानवे यांनी केला. चर्चेसाठी आता पुरेसा वेळ असल्याने येत्या पाच-सहा दिवसांत सगळ्या गोष्टींवर नेत्यांकडून शिक्कामोर्तब होईल. फोडाफोडीच्या वावड्या उठवल्या जात असल्या तरी अशी कुठलीही शक्‍यता नाही. शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेसची एकजूट असून आमचे आमदार सुरक्षित असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT