Aditya Thakray - Chandrakant Khaire
Aditya Thakray - Chandrakant Khaire 
छत्रपती संभाजीनगर

शिवसेनेच्या जागा वाढतील, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील- चंद्रकांत खैरे

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : ''महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेत महाराष्ट्र ढवळून काढला, त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला, आदित्य ठाकरेंची राज्यात मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेच्या जागा वाढतील आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील," असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला.

शहरातील औरंगपुरा भागात जिल्हा परिषद कार्यालयात चंद्रकांत खैरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. चंद्रकांत खैरे म्हणाले, ''औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड राहिला आहे, लोकसभेला काही दृष्टामुळे पराभव झाला, पण ती चूक आता पुन्हा होणार नाही. शहरातील पुर्व-पश्‍चिम आणि मध्य या तीनही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील. पश्‍चिम मध्ये भाजपच्या नगरसेवकाने बंडखोरी केली असली, तरी अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे संजय शिरसाट यांचाच विजय होईल. मध्यमधून प्रदीप जैस्वाल प्रचंड मतांनी निवडूण येतील, तर पुर्वमध्ये अतुल सावे यांनी प्रचाराचे योग्य नियोजन केल्यामुळे त्यांच्या विजयात देखील कुठल्याही प्रकारची अडचण नाही," 

कन्नड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी आणि हर्षवर्धन जाधव यांचे आवाहन पाहता काय वाटते? असे विचारले असता बंडखोरीचा कुठलाही परिणाम शिवसेनेवर होणार नाही आणि कन्नडची जागा आम्ही मोठ्या मताधिक्‍याने जिंकू, असा दावा खैरे यांनी केला. दोन दिवसापासून शहरात मोठा पाऊस झाला होता, आज मतदान असल्यामुळे आपण राजुरच्या गणपतीला साकडे घातले होते. वरुणराजा आज मतदान होईपर्यंत बरसू नको, मतदान झाल्यानंतर धो-धो बरस हे आपणे गाऱ्हाणे राजुरेश्‍वराने ऐकल्याचेही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT