Marathwada Graduate Elections Memory news beed
Marathwada Graduate Elections Memory news beed 
छत्रपती संभाजीनगर

पदवीधरची निवडणूक जाहीर होताच झाली जयसिंगरावांच्या विक्रमी विजयाची आठवण..

दत्ता देशमुख

बीड : मराठवाड पदवीधर निवडणुकीचे पघडम वाजले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित आहेत. भाजपकडून नावे अंतिम करण्याची प्रक्रीया सुरु आहे. मात्र, भाजपने नेहमीप्रमाणे पराभवाचे प्रयोग करण्यापेक्षा जयसिंगराव गायकवाड यांना मैदानात उतरावे, असा सुर त्यांचे समर्थक आळवित आहेत.

नुकत्याच झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांच्या वाढदिवसाला तसा ट्रेंडही समर्थकांनी सोशल मिडीयावर चालविला. त्यांच्या उमेदवारीच्या मागणीसोबत जयसिंगराव गायकवाड यांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि प्रदीर्घ अनुभवाचा उल्लेखही केला जात आहे. विशेष म्हणजे या मतदार संघातील हुकमी एक्का मानले जाणारे दिवंगत वसंतराव काळे यांच्या पराभवाची किमयाही जयसिंगराव गायकवाड यांनी केलेली आहे. याहून विशेष म्हणजे वसंतराव काळे यांच्यासह इतर ३३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करुन विजयाचा भिमपराक्रमही जयसिंगराव गायकवाड यांच्याच नावे आहे.

१९९६ ला झालेल्या या निवडणुकीवेळी एकूण २६ हजार मतांपैकी भाजपची नोंदणी साडेतीन हजार मतांची असताना आपल्या संघटन, वक्तृत्व आणि राजकीय चातुर्याच्या जोरावर जयसिंगराव गायकवाड यांनी ही किमया घडविली होती. त्याचेही दाखले आता त्यांचे समर्थक देत आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात सलग तीन वेळा लोकसभा निवडणुक जिंकणाऱ्या जयसिंगराव गायकवाड यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्यामुळेच एकमेव विजय नोंदविता आलेला आहे.

दोन वेळा भाजप तर एकवेळा ते राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून विजयी झाले. तर, या पदवीधर मतदार संघाचेही त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे त्यांना या मतदार संघातील ७६ तालुक्यांची खडानखडा माहिती असल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत. सध्या भाजपाच्या किसान अघाडीचे राष्ट्रीय सरचीटणीस असणारे जयसिंगराव गायकवाड यांनी केंद्रात आणि राज्यात मंत्री म्हणून काम केलेले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बाल स्वयंसेवकापासून ते विस्तारक आणि प्रचारक अशी भूमिका पार पाडणाऱ्या जयसिंगराव गायकवाड यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहमंत्री, मंत्री, भारतीय जनसंघात संघटनमंत्री आणि भाजपमध्ये युवा मोर्चा आणि प्रदेश कार्यकारणीवर अनेक पदांवर काम केलेले आहे. त्यांच्या संपर्काचे आणि संघटनाचे कौशल्य वाखानण्याजोगे आहे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे समकालिन असलेले जयसिंगराव गायकवाड यांना मानणारा वर्ग तर आहेच. शिवाय त्यांच्याकडे विजयाचे हातखंडेही असल्याने आता भाजपने पराभवाचे प्रयोग थांबवून मतदार संघाची नाळ माहित असलेल्या जयसिंगराव गायकवाड यांना मैदानात उतरावे, अशी समर्थकांची भावना आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT