छत्रपती संभाजीनगर

मराठा आरक्षणाच्या विवंचनेतून शिक्षकाची आत्महत्या -  शिक्षण म्हणजे काय? आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीतून उपस्थित केला प्रश्न

विकास गाढवे

लातूर : मराठा आरक्षण नसल्याने  मुलांना शिकवूनही त्यांना नोकरी मिळत नाही. यामुळे संसाराचा गाडा पगारावर चालेना. या विवंचनेतून माटेफळ (ता. लातूर) येथील शिक्षक रमेश ज्ञानेश्वर पाटील (वय 50) यांनी बुधवारी (ता. आठ) सकाळी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे मराठा आरक्षणाची समाजातील सर्व घटकांना असलेली गरज ठळकपणे पुढे आली आहे. 

शिकूनही सर्व मुले घरीच असल्याने शेवटी शिक्षण म्हणजे काय? असा प्रश्न (कै.) पाटील यांनी चिठ्ठीतून उपस्थित केलेला प्रश्न सर्वांनाच विचार करायला लावणारा ठरला आहे. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांचे शवविच्छेदन रोखून धरले असून मुरूडच्या (ता. लातूर) ग्रामीण रूग्णालयात गर्दी जमली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नायब तहसीलदार शिवाजी पालेपाड मुरूडला रवाना झाले आहेत.

रमेश पाटील हे निवळी (ता. लातूर) येथील मांजरा चॅरिटेबल ट्रॅस्टच्या निळकंठेश्वर विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांना माटेफळ येथे जमिन असून तेथून ते दररोज शाळेत जाऊन नोकरी करत होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. थोरल्या मुलीचे इंजिनिअरींगचे शिक्षण झाले असून तिने संगणक (कॉम्प्युटर) शाखेत अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. दुसऱ्या मुलीचे एम. एस्सी.पर्यंत शिक्षण झाले असून ती विद्यापीठात दुसरी तर जिल्ह्यातून प्रथम आली आहे. मुलगा कला शाखेचा पदवीधर आहे. तीनही मुले उच्चशिक्षित असूनही त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकरीची संधी मिळत नसल्याने रमेश पाटील निराश होते. 

शिकूनही तीनही मुले घरीच असल्याने त्यांचा पगारातून कौटुंबिक खर्च भागत नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर खासगी कर्ज झाले होते. या नैराश्यातूनच त्यांनी बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी खिशात लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांनी 'तुम्ही विचार करा, शिक्षणाचा उपयोग काय आहे,' असा प्रश्न उपस्थित केला असून संसाराचा गाडा चालवण्यासाठी सरकारने पत्नीला लवकर पेन्शन मंजूर करून सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे. आरक्षणासाठी शिक्षकाने आत्महत्या केल्यामुळे समाजमन सुन्न झाले असून तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT