bamb save bagde
bamb save bagde 
छत्रपती संभाजीनगर

भाजपकडून सावेंना मुदतवाढ? की बंब यांना संधी?

सरकारनामा

औरंगाबादः शिवसेनेप्रमाणेच जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात भाजपने आपल्या जागा राखत शतप्रतिशत यश मिळवले आहे. फुलंब्री, औरंगाबाद पुर्व आणि गंगापूर-खुल्ताबाद मतदारंसघातून अनुक्रमे हरिभाऊ बागडे, अतुल सावे, प्रशांत बंब मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले आहेत. राज्यात सत्ता स्थापनेला वेग आला असतांना भाजपकडून मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार याची उत्सूकता पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लागली आहे.

निवडणुकीच्या पाच महिने आधी अतुल सावे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. आता सावे यांना पक्ष मुदतवाढ देणार? की मग गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघात विजयाची हॅट्रीक साधणाऱ्या बंब यांना संधी देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अतुल सावे यांनी पाच महिन्याच्या अल्पकाळात राज्यमंत्री म्हणून छाप पाडण्यात यश मिळवले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शहरातील पाण्याचा गंभीर प्रश्‍न सोडवण्यासाठी पाठपुराव करत 1680 कोटींची पाणी योजना मंजुर करून घेतली. अर्थात त्याचा फायदा एकट्या अतुल सावेंनाच नाही, तर जिल्ह्यातील भाजपच्या बागडे आणि बंब या उमेदवारांना देखील झाल्याचे बोलले जाते. 2014 मध्ये कमी मतांनी विजयी झालेल्या अतुल सावे यांनी यावेळी मात्र पंधरा हजार मतांनी विजय मिळवत सलग दुसऱ्या विजयांची नोंद केली.

पाच महिनेच राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे पक्षनेतृत्व सावे यांना मुदत वाढ देऊन पुन्हा काम करण्याची संधी देईल अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यांशी असलेले चांगले संबंध त्यांना मंत्रीपद मिळवण्यात कामी येतील असे बोलले जाते.

सावेंना बंब यांची स्पर्धा?

अतुल सावे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता असली तरी त्यांना गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. बंब यांच्या विरोधात राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीने जोर लावला होता, पण बंब यांनी आघाडीच्या डावपेचांवर मात करत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत वेगळ्या विक्रमाची नोंद केली आहे. अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून बंब यांची ओळख आहे.

मतदारसंघात भाजपच्या कुठल्याही मोठ्या नेत्याची सभा न होता देखील बंब यांनी एकट्याने लढा देत मिळवलेला तिसरा विजय त्यामुळेच महत्वाचा ठरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लासूर येथील सभा ऐनवेळी रद्द झाल्यानंतरही बंब यांनी निकराने लढा देत आपली जागा राखली. मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक यावेळी त्यांना मंत्रीपद मिळवून देते का? हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT