Twelve From Tablighi Jammat Markaz Found in Nanded
Twelve From Tablighi Jammat Markaz Found in Nanded 
छत्रपती संभाजीनगर

नांदेडमध्ये दिल्लीहून दोन व इंडोनेशियातून १० तबलीगी आले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरातील तबलीगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झालेले बारा जण नांदेडला आले आहेत. त्या बारा पैकी दोन दिल्लीतील तर दहा इंडोनेशिया येथील असल्याचे कळाल्यानंतर नांदेड शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या १२ जणांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे. आपले अस्तित्व लपवून बसलेल्या या बारा जणांमुळे (सहा पुरुष व सहा महिला) नांदेडकरांचा ताप वाढला आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी मागील एक महिन्यापासून जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्याने कुणीही जिल्ह्यातून बाहेर तर बाहेरुन कुणी आत घेतले नाही. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र, दिल्ली येथून तबलीगी जमातीतून आलेल्या व्यक्तीमुळे प्रशासन हतबल झाले आहे. त्यांनी पोलिसांमार्फत या तबलीगी जमातीच्या लोकांची धरपकड केली. त्यातील काही जण सापडले तर काही जण आपले अस्तित्व लपून बसले होते. त्यांनाही शोधून काढून क्वारंटाईन केले आहे. त्यांना सध्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी ठेवण्यात आले असून सोमवार (ता. सहा) सायंकाळपर्यंत त्यांचा तपासणी अहवाल प्रशासनाला मिळणार आहे.

स्वॅब पुण्याला तपासणीसाठी

रविवारी (ता. पाच) त्यांचे ‘स्वॅब’ घेऊन पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. परंतु,, त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट येण्यापूर्वीच ते बाराजण नांदेडसाठी धोकादायक तर ठरणार नाहीत ना, अशी धास्तीच जणू जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि नांदेडकरांनी घेतली आहे. आज (ता. सहा) सायंकाळी या बारा संशयितांच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.

इंडोनेशियाहून परतलेले ते दहा संशयित आणि दिल्ली येथील दोन असे बारा आणि पूर्वीचे तीन असे एकूण १५ संशयित सध्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल आहेत. तर दुसरीकडे शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातील आयसोलेशन वार्डामध्ये पाच जण ठेवण्यात आले आहेत. मात्र या पाचही जणांचा पूर्वीच स्वॅब अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठलीही भीती नसल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT