छत्रपती संभाजीनगर

युतीची चर्चा गेली खड्ड्यात, प्रथम शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा; उद्धव ठाकरेंचा बीडमध्ये घणाघात

सरकारनामा ब्युरो

बीड : ''या वर्षीचा दुष्काळ गंभीर आहे, पण शिवसेना खंबीर आहे. केवळ कोरडी भाषणं आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाही. सरकारी यंत्रणेच्या सुस्त पडलेल्या अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय. युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा," अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडच्या सभेत केली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी (ता. नऊ) बीड मध्ये आले होते. त्यांनी सर्व प्रथम तालुक्यातील म्हाळसजवळा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी येथील शेतकऱ्यांना पशुखाद्यांचं वाटप केलं. यासह शहरात ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना ठाकरे यांनी 'तुम्ही शिवसनेनेचा दुष्काळ हटवा मी तुमचा दुष्काळ हटवतो,' असे नागरीकांना आव्हान केले. 

यावेळी भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, "दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते. बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर तुमच्या रेशनमध्ये कपात झाली, हे खरं आहे की खोटं? दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येऊन गेलं, मात्र तुमच्या हातात काही मदत पडली का? पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. हे ना शेतकऱ्या्ंचे प्रश्न सोडवू शकले ना राममंदीराचा मुद्दा सोडवू शकले," पीकविम्याचा फायदा झाला नसल्याचं ठाकरे यांनी यावेळी काही शेतकऱ्यांच्या तोडून वदवून घेतलं. 

सध्या भाजप गाजरे दाखवण्याचे काम करतो आहे, मात्र, गाजरे वाटू शकतील एवढीही त्यांची ऐपत नाही, असे सांगत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो, असंही त्यांनी सांगितलं. खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत  असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होतं, असही ते म्हणाले. "आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे. नव्या वर्षात अच्छे दिनच नाही तर अच्छी वर्षही येऊद्या अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो." असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. 

यावेळी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे,पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार रविंद्र गायवाड, आमदार निलम गोरे, माजी आमदार बदामराव पंडीत, माजी आमदार सुनिल धांडे, शिवसेने जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT