छत्रपती संभाजीनगर

आघाडी सरकार सत्तेवर आले तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ - शरद पवार

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : पिकविणारा जगला तर खाणारा जगेल म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी देऊ, असे  आश्वासन देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यानी येथे दिले.  उस्मानाबाद येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. 15 ) आयोजीत सभेत ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, राणाजगजितसिंह पाटील, विक्रम काळे, एस.टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील,युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, स्वाभीमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे आदी उपस्थित होते.

शरद  पवार म्हणाले की, भाजपा सरकारातील मंत्र्याना खाणाऱ्यां लोकांची काळजी आहे पण पिकविणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. कृषीमंत्री असताना कांद्याचे दर वाढले तर हे लोक मोठा गोंधळ करुन सभागृह डोक्यावर घेत होते, पण तेव्हाही आम्ही शेतकऱ्यांचाच विचार केला आणि यापुढेही तेच कऱणार . देशात आघाडी सरकारला सत्ता दिल्यास पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देवू. मोठ्या उद्योजकांचे कर्जमाफ करणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ का केले नाही असा सवालही पवार यानी केंद्र सरकारला केला.

नरेंद्र मोदी राज्यात सभा घेताना फक्त गांधी, नेहरु व माझ्या कुटुंबियावर टीका करत आहेत. पण दुष्काळ, चारा छावणी, कर्जमाफी शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर बोलत नाहीत. गांधी कुटुंबियावर आरोप करताना मोदी विचारतात त्यानी काय केले? असे कुटुंब दाखवा ज्या कुटुंबियातील दोघांनी देशाचे पंतप्रधान पद भुषवित असताना बलिदान दिले, त्यांच्या बलिदानाविषयी मोदीना आस्था नसल्याची खंतही पवार यानी व्यक्त केली.  उध्दव ठाकरे यानी पंढरपुरात एकटे लढण्याची घोषणा करुनही पुन्हा भाजपच्या गळ्यात गळे घातले. सत्तेसाठी या दोघांची युती झाली असल्याची बाब आता महाराष्ट्राच्या जनतेला कळलेली आहे असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT