Ex mp chandrakant khaire and imtiaz jalil contrevercey news
Ex mp chandrakant khaire and imtiaz jalil contrevercey news 
छत्रपती संभाजीनगर

मंदिरे उघडायला आम्ही समर्थ, तुमच्या सल्ल्यांची गरज नाही...

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः कोरोना संकटामुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे आता खुली झाली पाहिजे, अशी आमची देखील मागणी आहे. पण सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री संपुर्ण परिस्थितीचा आढावा, कोरोनाचा धोका आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतील. आम्ही सरकारी नियमांचे पालन करणारे आहोत, मोडणारे नाही. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी यावरून राजकारण करु नये. राहिला प्रश्न मंदिरे खुली करण्याचा, तर त्यासाठी आम्ही समर्थ आहोत, आम्हाला तुमच्या सल्ल्यांची गरज नाही, असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला.

इम्तियाज जलील यांनी बुधवारी सोशल मिडिया आणि एका वृत्त वाहिनीवरील चर्चेत सहभागी होतांना धार्मिक स्थळे खुली करण्यावरून सरकारला अल्टीमेटम दिला होता. १ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्यामुळे हिंदूनी आपापली मंदिरे खुली करावीत असे आवाहन करतांनाच २ सप्टेंबर रोजी मी स्वतः मिशिदीत जाऊन सामुहिक नमाज पडणार असल्याचे जाहीर केले आहे.

यावरून आता शिवसेना विरुध्द एमआयएम असा वाद पेटला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी `सरकारनामा`शी बोलतांना इम्तियाज जलील हे या मुद्यावरून राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. खैरे म्हणाले, ३१ आॅगस्ट रोजी लाॅकडाऊन-३ ची मुदत संपत आहे. राज्य सरकारने बहुतांश गोष्टी खुल्या केल्या आहेत. राज्यातील धार्मिक स्थळे व त्या शेजारी असलेल्या फळ-फुल-हार,धार्मिक पुस्तक व साहित्यांची दुकाने, हाॅटेल व इतर छोट्या व्यावसायिकांचा उदर्निवाह आहे.

पण गेल्या पाच महिन्यांपासून त्यांची फरफट आणि उपसामार होत आहे. सर्वसामान्यांना देखील पुजाअर्चा व प्रार्थना करता येत नाहीये. त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली होती. येत्या काही दिवसांत या बद्दल निर्णय जाहीर होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे मागणी करायची आणि मग श्रेय लाटायचे यासाठी इम्तियाज जलील यांनी चालवलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.

मशिदींमध्ये नमाज सुरूच..

दोन सप्टेंबरला मशिदीत जाऊन सामुहिक नमाज पडणार, त्या खुल्या करणार अशी वल्गना इम्तियाज जलील यांनी केली आहे. हे  देखील त्यांचे नाटकच आहे. शहरातील अनेक मशिदींमध्ये नियमबाह्य पद्धतीने दोनशे-अडीचशेच्या संख्येने नमाज अदा केली जात आहे. मी स्वतः अनेक ठिकाणी हे चित्र पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी उगाच आव आणू नये. सरकार ठरवेल त्याच पद्धतीने सगळ्यांना वागावे लागेल, इम्तियाज जलील हे मशिदी खुल्या करणारे कोण? असा, सवालही खैरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT