Ashok Chavan news parbhani
Ashok Chavan news parbhani 
छत्रपती संभाजीनगर

महाविकास आघाडीचा प्रस्ताव घेऊन गेलो, तेव्हा सोनिया गांधी नाराज झाल्या होत्या..

राजेश काटकर

परभणी ः  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी आणि त्यात काॅंग्रेसचा सहभाग असावा ही मागणी घेऊन आम्ही सोनिया गांधी यांच्याकडे गेलो होतो. शिवसेना- राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांना अजिबात आवडला नव्हता, त्या नाराज झाल्या होत्या असा खुलासा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. काॅंग्रेस संपवण्याचा विरोधकांचा डाव होता. जर आम्ही सत्तेत सहभागी झालो नसतो तर आमचा पक्ष संपला असता, असेही चव्हाण यांनी सांगितले.

मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्याचा दौरा अशोक चव्हाण सध्या करतायेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत कामांचा आढावा आणि शेतकरी, कामगार विरोधी कायद्याबद्दल जनजागृती ते सध्या करत आहेत. या अतंर्गत नुकताच् परभणी येथे काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी अशोक चव्हाण यांनी अनेक गोष्टींचा उलगडा तर केलाच, पण निधी वाटपात सरकारकडून काॅंग्रेसवर अन्याय केला जात असल्याचा आरोपही केला.

 राज्यातील तीन पक्षांच्या सरकारमध्ये काॅंग्रेस सहभागी असली तरी आमच्या ताब्यात असलेल्या नगरपालिका, महापालिकांना सरकारकडून निधी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आम्ही वेळोवेळी यासाठी पाठपुरावा आणि मागणी केली आहे, सर्वांना समान निधीचे वाटप झाले पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा महाविकास आघाडीचा विचार आणि हालचालील सुरू झाल्या, तेव्हा भाजपला सत्तेपासून रोखणे हा एकमेव उद्देश होता. काॅंग्रेसने सत्तेत सहभागी झालं पाहिजे असे ९० टक्के आमदारांचे तसेच राज्यातील नेत्यांचे मत होते. पण जेव्हा आम्ही आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे महाविकास आघाडीचा प्रस्ताव घेऊन गेलो, तेव्हा त्या रागावल्या, नाराज झाल्या. तुम्ही असा प्रस्ताव कसा काय आणू शकता, असे म्हणत त्यांनी विरोध केला होता.

पण तेव्हा राज्यातील आमदारांचे मत आणि भाजपला रोखण्यासाठी आपण सत्तेत सहभागी झालो पाहिजे हे पटवून दिले, तेव्हा त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा खुलासा अशोक चव्हाण यांनी केला. राज्यातील सत्तेत असलो तरी काॅंग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपालिका व महापालिकांना पुरेसा निधी मिळत नाही, असा आरोप करतांना हे बरोबर नसल्याचेही चव्हाण म्हणाले.

दरम्यान, अशाच प्रकारचा आरोप काॅंग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोंरट्याल यांनी काही महिन्यांपुर्वी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यानेच सरकारला घरचा आहेर दिल्याने याची त्यावेळी राज्यभरात चर्चा झाली होती. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी देखील तीर री ओढत आपल्या सरकारवर निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडली. त्यानंतर मात्र अशोक चव्हाण यांनी आपण असे बोललोच नाही असे म्हणत सारवासारव केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT