dhananjay_munde_pankaja_munde
dhananjay_munde_pankaja_munde 
छत्रपती संभाजीनगर

गंगाखेड शुगरबद्दल बोलणारे धनंजय मुंडे वैद्यनाथबद्दल गप्प का ? - कालिदास आपेट 

दत्ता देशमुख

बीड : रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर या साखर कारखान्याबद्दल नेहमी आवाज उठविणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याबाबत गप्प का? असा सवाल शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास अपेट यांनी केला. 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सरत्या गाळप हंगामातील ‘एफआरपी’ रक्कम अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. 
बीड - नगर - परळी लोहमार्गाची कामे, मुख्यमंत्री सडक योजनेतील कामांचे ठेके दोघांच्याही समर्थकांना मिळतात. या कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत दोघांचीही चुप्पीच असते. तर, परळीतला जलयुक्त शिवारचा अपहार असेल तर धनंजय मुंडे गप्प राहीलेले आहेत आणि परळी पालिकेच्या अनियमिततेबाबत पंकजांनीही कायम मौन धारण केलेले आहे.

 त्यामुळे कालिदास अपेट यांनी कारखान्याच्या एफआरपीचा मुद्दा उपस्थित करुन धनंजय मुंडे यांना सवाल केला असला तरी त्यांच्या या वक्तव्यातून या मुंडे भावंडे ‘एकच’ अशी होणारी चर्चा खरी या मर्मावर तर बोट ठेवले नाही ना असेही राजकीय जाणकारणांचे मत आहे. 

कारखान्यात गाळपाला ऊस घातल्यानंतर शेतकऱ्यांना १४ दिवसांत ‘एफआरपी’ची रक्कम एकरकमी देण्याची कायदेशिर तरतूद आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सन २०१७-१८ च्या गाळप हंगामाची ‘एफआरपी’ आजतागायत दिली नाही असेही कालिदास अपेट म्हणाले. रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर बद्दल नेहमी आक्रमकपणे आवाज उठविणारे धनंजय मुंडे वैद्यनाथ साखर कारखान्याबाबत गप्प का? असा सवालही त्यांनी केला.

समान काम समान वेतन कायद्यानुसार ऊसतोडणी मजूराला हार्वेस्टरप्रमाणे प्रतिटन चारशे रुपये मिळावेत, प्रतिटन साडेतीन हजार रुपये पहिला हप्ता द्यावा, दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतराची अट काढून टाकावी, शासकीय वहातुक दराप्रमाणे ऊसवहातुक मिळावी आणि इथेनॉलचा इंधन म्हणून वापर बंधनकारक करावा या मागण्यासाठी ११ सप्टेंबरला सिरसाळा (ता. परळी) शेतकरी, वाहतुक ठेकेदार, व ऊसतोडणी कामगारांची संयुक्त ऊस परिषद शेतकरी संघटनेने आयोजित केली आहे. याच्या प्रचारासाठी बुधवारी मोहा (ता. परळी) येथे आयोजित सभेत श्री. अपेट बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT