Will Dhananjay Munde Oppose Jaydatta Kshirsagar from Getting Post
Will Dhananjay Munde Oppose Jaydatta Kshirsagar from Getting Post 
छत्रपती संभाजीनगर

राज्यात सत्ता, जिल्ह्यातही महाविकास आघाडी पण जयदत्त क्षीरसागरांना काय?

दत्ता देशमुख

बीड : राज्यात महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. जिल्ह्यातही महाविकास आघाडीचाच बोलबाला सुरु झाला आहे. परंतु, शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना स्थान काय, असा प्रश्न राजकीय घटनांवरुन निर्माण होत आहे. 

जिल्ह्यात सत्तेची गाडी हाकणारे नेमके क्षीरसागर यांच्या विरोधातले आहेत. पंचायत समितीचे सभापती ते राज्यात विविध खात्यांचे मंत्री अशी जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय कारकीर्द राहीलेली आहे. चार वेळा आमदार म्हणून विधानसभेत विजयी झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा या विधानसभेला बीड मतदार संघातून झालेल्या पराभवाचा आकडाही चौथा आहे. दरम्यान, सुरुवातीपासून काँग्रेसी विचाराचे राहीलेले जयदत्त क्षीरसागर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादून शिवसेनेत गेले. शिवसेनेनेही त्यांचा सहा महिन्यांसाठी कॅबीनेट मंत्रीपद देऊन गौरव केला. परंतु, विधानसभा निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून त्यांचा काठावर पराभव झाला. 

पराभव तसा जयदत्त क्षीरसागर यांना नवा नाही. अनेक वेळा पराभवानंतरही खचून न जाता लोकसंपर्कात सातत्य ठेवून विजय मिळविलेला आहे. मात्र, त्याच वेळी त्यांनी सत्ता कोणाचीही असली तरी वैयक्तीक संबंध जपत विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळी जिल्ह्यातून राष्ट्रवादीकडून एकमेव जयदत्त क्षीरसागर विजयी झाले. केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणीत सरकारे होती. तरीही त्यांनी केंद्रात नितीन गडकरी, राज्यात देवेंद्र फडणवीसांसह इतर नेते आणि जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्यांशी राजकीय संबंध जपत मतदार संघात भरभरुन निधी मिळविला. आता मात्र त्यांच्यासाठी राजकीय परिस्थिती अगदीच प्रतिकुल झाली आहे. 

राज्यात त्यांच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. एका पक्षात असतानाही त्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय हाडवैर होते. आता तर दोघे वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा बोलबाला असला तरी त्यात जयदत्त क्षीरसागर यांना वाटा कसा मिळणार असा प्रश्न आहे. जिल्ह्यातल्या महाविकास आघाडी म्हटले जात असले तरी राष्ट्रवादीचे सर्वाधिक चार आमदार असून या आघाडीतले प्रमुख नेते असलेले जयदत्त क्षीरसागर मात्र सर्वांचेच राजकीय विरोधक मानले जातात. त्यामुळे राज्यस्तरावरुन जरी काही पाठविले तरी जयदत्त क्षीरसागरांपर्यंत पोचणार कसे, असा प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT