ब्लॉग

अजित पवार-खडसेंची 'कानोकानी', उत्तर महाराष्ट्रातील बळ 'जोखूनी'

कैलास शिंदे, जळगाव

"मी माझ्या मनातले अजितदादांच्या कानात सांगितले'', असे खडसे यांनी सांगितले; तर "खडसे यांनी माझ्या कानात काय सांगितले, हे गुपित मी नाही सांगणार'', अशी गुगली अजित पवारांनी टाकली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकाच व्यासपीठावर आलेल्या दोन्ही नेत्यांच्या या संवादामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत...

भाजपवर नाराज असलेले खडसे राष्ट्रवादीत जाणार काय, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. खडसेंनी खरच 'घड्याळ' हातात बांधले, तर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढून आगामी निवडणुकीत त्यांचा फायदा होईल, असे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. परंतु, खडसेंनी संपूर्ण राजकीय जीवनात उत्तर महाराष्ट्रात भाजपचा वटवृक्ष करण्यासाठी कष्ट उपसले. त्यामुळे ते पक्षांतर न करता पक्षातच संघर्ष करून आपले अस्तित्व पुन्हा निर्माण करतील, अशीही चर्चा आहे. त्यामुळे पवार-खडसे या दोन्ही नेत्यांच्या 'कानोकानी'तून राज्यात उत्तर महाराष्ट्राचे राजकीय बळ वाढविण्याचा प्रयत्न होत आहे, असे चित्र तूर्तास तरी निर्माण झाले आहे.

अजित पवार व एकनाथराव खडसे हे दोन्ही मुरब्बी राजकीय नेते आहेत. दोघांनाही राजकारणातील दांडगा अनुभव आहे. त्यांनी पक्षाचे कार्य करण्यापासून सत्तेतही मंत्रिपद सांभाळले आहे. त्यामुळे दोघांच्या वक्तव्याला अन्‌ हालचालींनाही निश्‍चितच महत्त्व आहे. म्हणूनच त्यांच्या जळगावात झालेल्या 'कानोकानी'मुळे राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांचे ढग जमा झाले आहेत. या नेत्यांच्या चर्चेमुळे सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वातही निश्‍चित काहीअंशी चिंतेचे वातावरण पसरले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागल्यानंतर खडसे हे भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. पक्षाचे सरकार असताना त्यांच्या मागे लावण्यात आलेले चौकशीचे शुक्‍लकाष्ठ, मंत्रिमंडळात पुनर्प्रवेशाचा विषय आल्यास काहीतरी नवी टूम काढली जाणे, हे प्रकार म्हणजे आपले खच्चीकरण करण्यासाठी पक्षातून आपल्याविरुद्ध षडयंत्र होत असल्याचा खुला आरोप खडसे यांनीच जाहीरपणे केला आहे. त्यामुळेच खडसे यांनी आता आक्रमक पवित्रा आहे. त्यांनी विधिमंडळात थेट आपल्याच सरकारच्या कामाचे वाभाडे काढले होते. मंजूर झालेली कामे होत नसल्याबाबतही सरकारवर टीका केली होती. खडसे सरकारवरच तुटून पडल्याने नागपूर विधिमंडळात विरोधकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याच वेळी विधिमंडळात सत्ताधारी काँग्रेस पक्षातर्फे खडसेंसारखा नेता काँग्रेसमध्ये हवा, असे मत सत्ताधारी काँग्रेसच्या सदस्यांनी व्यक्त केले; तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही खडसे काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचे स्वागत आहे, असे जाहीरपणे सांगितले.

खडसेंची भाजपविषयी नाराजी आणि काँग्रेसचे प्रवेशाचे आमंत्रण याच वातावरणात जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात अजित पवार व खडसे एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि दोघांनीही 'कानगोष्टी' केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याचे संकेत मिळत आहेत. खडसे यांनी खरंच 'राष्ट्रवादी'त प्रवेश केला तर उत्तर महाराष्ट्रात 'घड्याळ' बळकट होईल काय, या प्रश्‍नाचे उत्तर 'होय' असेच असेल. खडसे हे संघर्ष करणारे नेते आहेत. त्यांना पक्षबांधणीचा चांगला अनुभव आहे. जळगाव जिल्ह्यात काँग्रेसची पाळेमुळे अगदी खोलवर रुजली होती. भाजपला थोडासाही विस्ताराला वाव नव्हता. त्या काळात त्यांनी भाजपच्या विस्तारासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न केले. त्यातूनच जिल्हा परिषद तसेच सहकार क्षेत्रातही भाजपच्या सत्तेचा झेंडा फडकविला. विधानसभा निवडणुकीत तर केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यात फिरून भाजपला जास्तीत जास्त जागा मिळवून दिल्या. एवढेच नव्हे, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मातब्बर नेते गळाला लावून त्यांना भाजपची उमेदवारी दिली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगले यश मिळाले, हे नाकारून चालणार नाही. म्हणूनच खडसेंसारखा नेता राष्ट्रवादीला मिळाला, तर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बळ मिळेल हे निश्‍चित आहे.

'दादा, जरा धीर धरा...'
आता खडसे खरच भाजप सोडतील काय, हाच प्रश्‍न आहे. कारण राज्यात भाजपचा वटवृक्ष करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, हे कोणीही नाकारणार नाही. याशिवाय "संघर्ष' हा त्यांचा पिंड आहे. त्यामुळे आपल्याच पक्षात संघर्ष करून ते अस्तित्व पुन्हा निर्माण करतील, पण पक्ष सोडणार नाहीत असेही सांगण्यात येते. मात्र, राजकारणात काहीही घडू शकते. तथापि, संघर्ष करूनही जर नेतृत्व साथ देण्यास तयार नसेल, तर ते निश्‍चितच पक्षांतराचीही वाट धरतील. त्यामुळेच खडसे यांनी अजित पवारांच्या कानात "जरा धीर धरा' असेच सांगितले असावे. त्यामुळे अजित पवारांनीही भविष्यात उत्तर महाराष्ट्रात पक्षाला अधिक बळ मिळण्यासाठी धीर धरला असून, खडसेंनी कानात सांगितलेले गुपित उघड न करण्यासाठी मौन बाळगले असावे, हाच राजकीय क्षेत्रातील मंडळींचा तर्क आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT