ब्लॉग

पुत्रवत आनंद दिघेंना बाळासाहेब का मारतील ? 

प्रकाश पाटील

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे नाते पितापुत्रासारखे होते. मला तीन मुलगे असले तरी आनंद हा माझा चौथा मुलगा आहे असे साहेब मोठ्या अभिमानाने जाहीरपणे सांगत. 

दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात झालेल्या (2001) शोकसभेत बाळासाहेब म्हणाले होते,"" आनंदच्या दाढीत हुकूमत होती. त्याच्या नादाला लागण्याची कोणाची हिम्मत नव्हती.'' राजकारणातील या गुरू-शिष्यांचे नाते केवळ ठाणे, मुंबईकरांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होते. दिघे यांच्या मृत्यूनंतर खूप राजकारण घडले. आरोपप्रत्यारोप झाले. काही असो आनंद दिघे नावाचे वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात होऊन गेले हे नाकारता येणार नाही. 

दिघे यांचा जन्म 27 जानेवारी 1952 चा. आज ते असते तर ते ही 66 वर्षाचे असते. मात्र त्यांच्यावर पन्नाशीच्या आतच काळाने झडप घातली. त्यांचा अपघाती मृत्यू ठाण्यातील आनंद चित्रपटगृहानजिक झाला 26 ऑगस्ट 2001 रोजी. त्यांना जाऊनही अठरा वर्षे झाली. आता त्यांच्या मृत्यूवर शंका व्यक्त केली जात आहे. थेट बाळासाहेबांकडेच बोट दाखविले जात आहे. 

कोकणातील शहकाटशहाच्या राजकारणावरून ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि खासदार नीलेश राणे आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यात गेल्या काही वर्षापासून कोकणात कलगितुरा सुरू आहे. राऊत हे नारायण राणेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्याला राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र जशास तसे उत्तर देत असतात. असे आरोपप्रत्यारोप नित्याचेच. पण, नीलेश यांनी आनंद दिघेंच्या मृत्यूला थेट बाळासाहेब जबाबदार आहेत असा सनसनाटी आरोप केला. 

या आरोपासह त्यांनी अन्यही आरोप केले आहेत. दिघेंच्या मृत्यूला बाळासाहेब जबाबदार आहेत हे दिघेंच्याच काय शिवसेनेतील कोणत्याही कार्यकर्त्याच्या पचनी पडणार नाही. मुळात दिघे आणि बाळासाहेबांचे तसे वैर असण्याचे काही कारणही नव्हते. बाळासाहेबांचे ते काही प्रतिस्पर्धी नव्हते. 

दिघे हे काही शिवसेनाप्रमुख बनले नसते. त्यांनी कधी ना माईक हातात घेतला ना कधी भाषण केले. बाळासाहेब ज्या प्रमाणे शिवसेनाप्रमुख होते त्याप्रमाणे ते ठाणे जिल्हाप्रमुख होते. बाळासाहेब जसे हिंदूह्दयसम्राट होते तसे दिघे शिवसेनेचे धर्मवीर होते. साहेबांनी आयुष्यात कधीही निवडणूक लढविली नाही तसे दिघेही लढले नाहीत. या दोन्ही नेत्यांवर शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिवापाड प्रेम केले. 

राज्यात साहेब रस्त्यावरच्या पोरांना आमदार, खासदार म्हणून निवडून आणत होते. तसा झंझावात दिघेंचा ठाणे जिल्ह्यात होता (तेव्हा पालघर जिल्हा नव्हता). जिल्ह्यातून पाच सात आमदार, तीन खासदार निवडून आणण्याची ज्या माणसात धमक होती त्या माणसाला कधीही आमदार, खासदारच मंत्रिही होता आले असते. अखेरच्या श्‍वासापर्यंत तसे मात्र झाले नाही. साहेबांचा आदेश शिरसावंद मानून हा माणूस आयुष्यभर शिवसेनेसाठी आणि गोरगरिबांसाठी चंदनाप्रमाणे झिजत राहिला. त्यांच्या कार्यपद्धतीवर बाळासाहेबांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली. पण, त्यांच्या इतका साहेबांचा लाडका जिल्हाप्रमुख शिवसेनेत दुसरा कोणीही नव्हता हे स्पष्टपणे नमूद करावे लागेल. 

बाळासाहेबांनंतर मनोहर जोशी, सुधीर जोशी असतील किंवा नारायण राणेही असतील. सर्व नेत्यांनी दिघेंचा शब्द कधी मोडला नाही. ठाण्यातील टेंबीनाका म्हणजे तर साधूसंन्याशी, मौलवी, पाद्री आणि गोरगरिबांचे हक्काचे ठिकाण होते. आबाल-वृद्ध टेंबीनाक्‍याची कधी पायरी चढले नाहीत असे कधी झाले नाही. दिघेंच्या अपघातीनिधनानंतर त्या दिवशी गोरगरिबांच्या चुली पेटल्या नव्हत्या. ठाण्याचा "आनंद' च निघून गेला होता. 

एका जिल्हा प्रमुखाच्या निधनाला जनसागर लोटावा. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहावे. प्रत्येकाला आपला आधार निघून गेल्याचे वाटावे यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. ते जाऊन आज अठरा वर्षे झाली तरी गोरगरिबांच्या वडापावच्या गाडीवरील दिघे यांचा फोटो कधी निघाला नाही. त्यांनी राजकारणात समाजकारणाला जोड दिली. विविध उपक्रम राबविले. रंजल्या गांजल्यांची सेवा केली. त्यांची ही एक बाजू असली तरी त्यांच्यावर समान सरकार चालविले जात असल्याचा आरोपही नेहमीच होत राहिला. 

दहशतीमुळे त्यांना लोक घाबरतात. त्यांच्या दरबारात न्यायनिवाडा कसा काय होतो ? असे बक्कळ आरोप डाव्या आणि समाजवादी मंडळींनी केले. दिघे यांनी त्यांची कधी पर्वा केली नाही. 

""शाखा हेच माझे घर, 
रात्रंदिवस साथ देणारे शिवसैनिक हेच माझे बंधू, 
जनसेवा हीच ईश्‍वरसेवा '' 

हे ब्रीद घेऊन ते राजकारण करीत राहिले. 

ठाणे पालिकेत 19 वर्षे शिवसेनेची सत्ता होती. त्यांच्या पश्‍चात आजही ती आहे. ठाण्यात त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेते होते. सतीश प्रधान, साबीरभाई शेख, मो. दा.जोशी, गणेश नाईक. या सर्वांशी त्यांचे म्हणावे असे सख्यही नव्हते. दिघे हे वेगळेच रसायन होते. ठाणे जिल्ह्यात दिघे यांना बाळासाहेबांनी नेहमीच झुकते माफ दिले. आज जे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेही दिघेंच्या तालमीत घडले आहेत. त्यांनी जिल्ह्यात असे शेकडो "एकनाथ' घडविले. एकवेळ शिवसेनेवर केलेली टीका आनंद नावाचा शिवसैनिक सहन करीत असे पण, साहेबांविषयी वेडेवाकडे बोलले त्यांनी कधीच सहन केले नाही. साहेब म्हणजे दिघेंचा श्वास होता. 

शिवसेनेतही गेल्या साठ वर्षात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राज ठाकरे यांचा राजकीय क्षितिजावर उद्धव ठाकरे यांच्या अगोदर उदय झाला. राज यांच्याकडे लोक बाळासाहेबांचा वारसदार म्हणून पाहत होते. जेव्हा राज शिवसेनेत सक्रिय झाले तेव्हा त्यांचे फोटो बाळासाहेबांप्रमाणे शाखांमध्ये दिसत होते. 

शिवसेनेत जे फायरब्रॅंड नेते होते. त्यामध्ये नारायण राणे, शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर, आनंद दिघे आदी नेते राज यांना मानणारे होते. पुढे उद्धव शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर राज यांचे पंख आपोआप कापण्यात आले हा भाग वेगळा. बाळासाहेबांचा वारसदार म्हणून उद्धव पुढे आले. आज तेच बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत. राज शिवसेनेत नाहीत. मनसेत आहेत. राज यांनाही आनंद दिघे प्रिय होते हे कधी लपून राहिले. त्यांनीही दिघे यांच्या मृत्यूबाबत कधी "ब्र' काढला नाही. 

नीलेश राणे यांच्या अगोदर दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही नवी मुंबईतील निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या जाहीरसभेत दिघेंच्या मृत्यूबाबत विधान केले होते. खरेतर स्वत: गृहमंत्री असून आबांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश कधी दिल्याचे ऐकिवात नाही. 

नीलेश यांचे पिताश्री नारायण राणे हे स्वत: मुख्यमंत्री होते आणि अनेक वर्षे कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. म्हणजे ते शिवसेना-भाजपच्या जवळ नव्हते त्यांनीही कधी या प्रकरणावर भाष्य केले नाही. त्या नंतर देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यालाही आता चार वर्षे झाली. या वर्षात एकाही नेत्याला दिघे यांच्या मृत्यूचे नेमके काय झाले ? याचा प्रश्‍न का पडला नाही ? खरे तर इतक्‍या मोठ्या नेत्याच्या मृत्यूबाबत कोणी शंका घेत असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी. 

दिघे यांना जिल्हा प्रमुख हे पद वगळता राजकारणात कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती. दिघे यांनी लग्न केले नव्हते. त्यांना स्वत:चा असा संसार नव्हता. टेंबी नाक्‍यावरील चंद्रमौळीत दिघेंचे वास्तव होते. बाळासाहेब सिंह होते. आनंद हा त्यांचा छावा होता. या दोघांच्या नात्यातील जिव्हाळा कधी संपला नव्हता. आज ते दोघेही हयात नाहीत. मात्र या दोघांचे नाव घेऊन जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणात "आनंद' नाही इतकेच यानिमित्ताने म्हणावे लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT