RamSatpute UttamJankar VijaysinghMohitePatil
RamSatpute UttamJankar VijaysinghMohitePatil 
ब्लॉग

भाजपने -शिवसेनेनं एकाच म्यानात घातल्या अनेक तलवारी 

प्रमोद बोडके

सोलापूर: सत्तेतील पक्षाची गरज ही पक्षापेक्षा नेत्याला अधिक असते. त्यामुळे आज माळशिरस, करमाळा, पंढरपूर, बार्शी, माढा, मोहोळ, शहर मध्य, सोलापूर दक्षिण या मतदारसंघातील अनेक परंपरागत विरोधक भाजप-शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्रित आले आहेत.

याला पक्षात घेतले तर मी सोडून जाईल, त्याला पद दिले तर माझे खच्चीकरण होईल यासह अशा पद्धतीच्या धमक्‍या देणारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधले अनेक दिग्गज त्यांच्या प्रस्थापित विरोधकांच्या मांडली मांडी लावून आज बसले आहेत. 

1999 ते 2014 पर्यंत सत्तेत असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीला या नेत्यांमुळे पक्ष विस्ताराला मर्यादा आल्याने आघाडीत त्याच त्या चेहऱ्यांना संधी मिळत गेली. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीत तयार झालेल्या संस्थानिकांच्या हातात पक्ष गेला. आज पडत्या काळात हे संस्थानिक कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सोडून जाऊ लागल्याने डिपॉझिट वाचविण्याएवढाही शाश्‍वत कार्यकर्ता या दोन्ही पक्षात उरला नाही. 

मोहिते-पाटील भाजपमध्ये आल्यानंतरही उत्तम जानकर व तेथील मूळ भाजप कार्यकर्ते गुण्या गोविंदाने एकत्रित नांदत आहेत. मोहिते-पाटील असल्याने या तालुक्‍यातील जानकर, देशमुख आणि गिरमे यांना छुप्या पद्धतीने हाताळण्याची वेळ शरद पवार व अजित पवारांवर आली होती. मुख्यमंत्री फडणवीस मात्र आज त्यांना उघडपणे हाताळत आहेत हे विशेष.

 मोहिते-पाटील भाजपत असतानाही माढ्याचे आमदार बबनराव शिंदे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. मंगळवेढ्यात आमदार प्रशांत परिचारक भाजपच्या जवळ असतानाही कल्याणराव काळे, आमदार भारत भालके यांना भाजपने जवळ केले आहे. 

करमाळ्यात नारायण पाटील हे शिवसेनेचे विद्यमान आमदार असतानाही रश्‍मी बागल यांना प्रवेश देण्यात आला आहे. शहर मध्यसाठी महेश कोठे आणि दक्षिणमध्ये गणेश वानकर असतानाही माजी आमदार दिलीप माने यांना शिवसेनेने प्रवेश दिला आहे. नेत्यांपेक्षा पक्ष मोठा असल्याचे सांगण्याचे धाडस कॉंग्रेस व राष्ट्रवादीने केल्याचे दिसले नाही. शिवसेना, भाजपने हे धाडस दाखविल्याने राजकारणात नेत्यांपेक्षा पक्षाला किंमत आल्याचे सिद्ध होऊ लागले आहे. 

भाजपने आखून दिली मर्यादा 
कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये असताना अनेक नेते स्वत:ला जिल्ह्याचा व राज्याचा नेता समजत होते. भाजप, शिवसेनेने प्रत्येक नेत्याची मर्यादा आखून दिल्याने त्या नेत्याला त्याच्या भागापुरतेच मर्यादित ठेवले आहे. त्यामुळे एका म्यानात दोन काय अनेक तलवारी ठेवण्यात शिवसेना, भाजप यशस्वी झाल्याचे दिसत आहे. या पडझडीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीला धडा मिळाला असेल हे निश्‍चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT