ब्लॉग

शेतकरी आत्महत्यांचा दारूशी काय संबंध ?

केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्यांशी दारूचा संबंध जोडणे चुकीचे आहे. शेतकऱ्याच्या वाटेला येणारे भोग काही कमी नाहीत. काय पाप केले म्हणून शेतकरी म्हणून जन्माला आलो, अशी भावना त्यांच्यात झाली तर ते चुकीचे ठरू नये !

प्रकाश पाटील patilisprakash@gmail.com

दारूलाही (वाइन) इतिहास आहे. मद्यसंस्कृती ही प्रथम इजिप्तमध्ये आली. नंतर ती ग्रीस, स्पेन, मेक्‍सिको, रोम आणि अमेरिकेत पसरली. मद्याच्या बाजारात आज स्पेन महत्त्वाची भूमिका पार पाडत असून, सर्वांत निर्यात याच देशातून केली जाते. जगात आज एकही देश असा नाही, की तेथे मद्यविक्री होत नाही. युरोपमध्ये द्राक्षापासून निर्मिती करण्याचे प्रमाणही अधिक आहे. मद्याचे ब्रॅंड इतके आहेत, की काही विचारू नका. स्वस्त आणि उच्चप्रतिच्या मद्याची किंमत जर ऐकली तर डोळ्यांपुढे अंधारी येऊ शकते.

आपल्याकडे मद्यापेक्षा दारू नावानेच ती अधिक ओळखली जाते. इजिप्तमधून ही दारू भारतात केव्हा आली, की भारतात ती प्रथमपासूनच आहे, हे काही मला तरी सांगता येत नाही. तरीही दारू म्हणजे गंमतच आहे. दारूला सहजासहजी कोणी चांगले म्हणत नाही. वाईट हे शब्दच तिला चिकटले आहेत; पण आज दारू पिणेही प्रतिष्ठेचे समजले जाते. गरीब पितात ती दारू आणि श्रीमंत, गर्भश्रीमंत घेतात ती वाइन अशी वर्गवारीही केली जाते. आपल्या देशातही दारूचे फॅड इतके आले, की प्रत्येक प्रसंगाला ती लागतेच. सुख असो की दु:ख ती हवीच. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच दिवसांपासून दारूच्या चर्चेला उधाण आले आहे. शेतकरी आत्महत्येवरूनही वातावरण तापले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला दारूचे व्यसनही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. ज्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी किती जण दारू पित होते किंवा ते मद्यपी होते याचा तपास खरेतर सरकारने एखाद्या यंत्रणेद्वारे करायला हवा. दारू पिण्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असे म्हणणे चुकीचे असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. दारू तर सर्व जण पितात. अभिनेत्री हेमामालिनी, आमदार, खासदार, पत्रकारही ती पितात. मग शेतकरीच दारू पितो म्हणून का ओरड व्हावी, असे कडू यांचे म्हणणे आहे.

वास्तविक कडू हे खरेच बोलले; मात्र सार्वजनिक जीवनात वावरताना कटू सत्यही सांगायचे नाही, असा आपण नियम करून घेतला आहे की काय असा प्रश्‍न आहे. जे खरे आहे ते बोलायला काय हरकत आहे. ताकाला जायचे आणि भांडे का लपवायचे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असेही त्यांचे म्हणणे हे तर अगदी बरोबर आहे. केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी व मजूर त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. खासदार आणि आमदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाट वेतन आहे. त्यावर कोणी बोलत नाही की ओरड होत नाही. उद्योगपतींची कर्जे माफ केली जात आहेत. त्यावरही कोणी काही बोलत नाही. उलट उद्धटपणे कोणाची कर्जे माफ केली त्यांची नावे सांगा, असा मुर्खासारखा प्रश्‍न केला जातो तेव्हा संताप येतो. जे कोणी असा सवाल करतात त्यांनी शोधावे कोणाची कर्जे माफ केली ती? जीवघेण्या प्रश्‍नावरही आपण गंभीर होत नाही. उलट टिंगलटवाळी करण्यात कसली धन्यता! कधी नव्हे इतका शेतकरी संकटात सापडला आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना एक न्याय आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुसरा न्याय हे कसे चालेल. या ठिकाणी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

देशात आणि राज्यात कॉंग्रेसचे सरकार असताना मुंडे यांनी शेतकरी आणि इतर प्रश्‍नांवर टीका करताना केंद्र महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक देत आहे, अशी टीका करत. आमचे सरकार आले, तर अन्याय दूर केला जाईल. शेतकऱ्यांना सन्मानाने जगता येईल, असे ते म्हणत. दुर्दैवाने मुंडे आपल्यात नाहीत. आता केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार असताना शेतकऱ्यांना न्याय का मिळत नाही ? भिकेचा कटोरे घेऊन मायबाप सरकारच्या दारात जावे लागत आहे. न्याय मागण्यांसाठी मंत्रालयात गेलेल्या शेतकऱ्यांना पोटभरून चोप दिला जातो. रक्तबंबाळ केले जाते. हे कसले सरकार. शेतकऱ्याला ते आपले का म्हणून वाटावे?


खरेतर शेतकरी आत्महत्येशी दारूचा संबंध जोडताच कामा नये. आज शहरातील चित्र पाहिले तर शुल्लक गोष्टीसाठी दारू घोटणारे महाभाग काही कमी नाहीत. बॉस खेकसला तरी "नायंटी' घेणारे. टेन्शन आले म्हणून घेणारे. दु:ख विसरण्यासाठी घेणारे आहेतच की ! दारू पिण्याचे प्रमाण इतके वाढले आहे, की ती घेण्याला कोणते तरी एक कारण लागतेच. वास्तविक कोणी व्यसन करावे किंवा करू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न. एखादा घेतो म्हणून तो वाईट आणि घेत नाही म्हणून तो अगदी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असे समजण्याचे काहीच कारणही नाही. हेमामालिनीच काय सर्वच क्षेत्रांतील लोक दारू पितात. ती कोणी जाहीररीत्या घेत नाही इतकेच. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री जे. एफ. पटेल हे तर जाहीररीत्या सांगत की हो मी दारू पितो. अमेरिकेचे अध्यक्ष तर जाहीरपणे एखाद्याला बिअर पार्टी देतात. तेथे साधनसुचितेचा आव आणला जात नाही. सुखदु:ख सर्वांच्याच वाटेला येते. ते कमी अधिक प्रमाणात असू शकते. आजकाल दारू पिण्याला कारण लागत नाही. म्हणूनच दारूचा आणि शेतकरी आत्महत्यांचा संबंध जोडणे चुकीचे वाटते. दारूवरून शेतकऱ्याला का बदनाम केले जात आहे, हे कळत नाही. त्याच्या वाटेला येणारे भोग काही कमी नाहीत. काय पाप केले आणि शेतकरी म्हणून जन्माला आलो, अशी भावना त्यांच्यात झाली तर ते चुकीचे ठरू नये ! शेतकरी आत्महत्या हा संवेदशील प्रश्‍न आहे. त्याला नको त्या गोष्टी जोडून राजकारण करता कामा नये.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT