Chandrakant_Patil_
Chandrakant_Patil_ 
ब्लॉग

पश्‍चिम महाराष्ट्रात चंद्रकांदादा भाजपचे वर्चस्व निर्माण करतील का  ? 

निखिल पंडितराव.

कोल्हापूर: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करून भाजपने अनेक गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. जातीय समीकरणाबरोबरच भाजपसाठी सर्वाधिक महत्त्व आहे, ते पक्ष व संघटना बळकट करणे. राज्याबरोबरच पश्‍चिम महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित करून भाजप अधिक वेगाने वाढविण्यासाठीचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष पश्‍चिम महाराष्ट्रात प्रमुख आहेत. त्या तुलनेत भाजपची ताकद कमी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप पश्‍चिम महाराष्ट्रात आपले जाळे अधिक मजबूत करण्याबरोबरच संघटन बळकट करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्नशील राहणार, हे चंद्रकांत पाटील यांच्या निवडीवरून दिसते.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होण्याचा मान चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने कोल्हापूरला मिळाला. यामागे पश्‍चिम महाराष्ट्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व तयार करण्याचा आणि स्वतःचे एक वेगळे लॉबींग तयार करण्याचा आडाखा भाजपचा आहे. पक्ष सर्वश्रेष्ठ, त्याच्यापुढे काही नाही, असे सूत्र घेऊनच भाजप आपले संघटन बळकट करत आहे. पक्ष संघटन बळकट असेल तरच सत्ता येऊ शकते, असे सरळ गणित भाजपने नेहमीच आखले. 

दिल्लीतील सत्तेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपची सत्ता हवी, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरात झालेल्या एका राष्ट्रीय अधिवेशात सांगितले होते. त्यानुसार भाजपने राज्यभर आपले जाळे विस्तारले. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे या पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे सोडल्यास शिवसेनेचे जाळे अधिक विस्तारलेले आहे. विरोधी पक्षाबरोबरच मित्रपक्षाच्या तोडीस तोड आपले जाळे उभे करण्याचे ध्येय भाजपचे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपला प्रत्येक वेळी स्थानिक गट-तटांच्या कार्यकर्त्यांच्यावरच मदार ठेवावी लागते किंवा त्यांना पक्षात घेऊन पदे बहाल करावी लागतात, अशी स्थिती आहे.

लोकसभा निवडणुकीत जनतेने जो कौल दिला तो कौल विधानसभेला मिळेलच, अशी खूणगाठ भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी बांधली आहे. त्यानुसार त्यांनी निवडणुकीची तयारीही जोमाने सुरू करून अप्रत्यक्षपणे प्रचारास सुरवातही केली आहे; परंतु लोकसभेप्रमाणे विधानसभेला जनता आपल्याला साथ देईल, असे गृहीत धरणे त्यांच्यासाठी योग्य ठरणार नाही. मतदारराजा आज जागृत झाला आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तो अनेक ठिकाणी वेगवेगळा कौल देण्याचा प्रयत्न करतोय आणि नेत्यांनाही सांगतो, "साहेब लोकसभेला तुमच्याबरोबर, पण विधानसभेला विचार करू''. त्यामुळे विधानसभेसाठी भाजपला वेगळी व्यूहरचना करावी लागणार हे निश्‍चित.


पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचे जाळे, साखर पट्‌टा असणारे जिल्हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो; परंतु 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा किल्ला ढासळण्यास सुरवात झाली. पुणे आणि सांगलीमध्ये भाजपने नियोजनबद्ध कामगिरी केली. सातारा अद्यापही राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने ताब्यात ठेवले असले तरी तेथे भाजपने मोठे जाळे विस्तारले आहे. कदाचित तेथे शिवसेनेलाच त्याचा धक्का बसण्याची शक्‍यता आहे. कोल्हापुरात भाजपला विस्तार करण्यास अजून अडचण आहे. शिवसेनेचे सहा आमदार आणि दोन खासदारांसह त्यांचे जाळे खूपच विस्तारले असून त्यामुळे थेट भाजपला विस्तारासाठी खडतर प्रयत्न करावे लागत आहेत किंवा गट-तटाचे राजकारण खेळून पक्ष विस्तार सुरू आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कॉंग्रेसचे नूतन कार्याध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांच्यापुढे पक्ष संघटन बळकट करण्याचे आव्हान आहे. या दोन्ही पक्षांतर्गत असणारी गटबाजी आणि घराणेशाही हे मुद्दे आता मतदाराला बोचत असल्याने हे मुद्दे खोडून काढण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहेच, शिवाय संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे अथक प्रयत्न त्यांना करावे लागतील, याची जाणीव भाजपच्या नेत्यांना चांगलीच आहे. वेळप्रसंगी विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घ्यायचे आणि पक्ष विस्तार मजबूत करण्याची तयारी ही भाजपची आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील कार्यकर्ते ते नेता, कोणताही गॉडफादर नसलेला नेता, संघटन कौशल्य आणि कोणत्याही पक्षातील लोकांशी गोड बोलून बरोबर घ्यायचे आणि आपला पक्ष वाढवण्याची खुबी असलेला नेता असल्याने भाजपचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पाया अधिक बळकट करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून करणार हे निश्‍चित दिसत आहे. राज्यातही श्री. पाटील यांनी अनेकांना भाजपमध्ये घेऊन पक्ष विस्तार केला. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पुढे आपले जाळे विस्तारण्याचे काम मोठ्या वेगाने करणार. पक्ष, संघटना मजबुतीकरण हेच त्यांच्या पक्षाचे दिल्लीपासून गल्लीपर्यंत ध्येय आहे.

दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र यासाठी स्वतंत्रपणे विचार करण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला कोल्हापुरात दोन्ही जागांवर विजय मिळाला असला तरी भाजपचे विस्तारलेले जाळे त्यांना मदतीसाठी कारणीभूत ठरले हे विसरता कामा नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह सर्वत्र भाजपचे जाळे विस्तारले आहेच. राहिला पश्‍चिम महाराष्ट्र आता श्री. पाटील यांच्या माध्यमातून केला जाईल. राजकारणात कराव्या लागणाऱ्या सर्व जोडण्या श्री. पाटील करणार हे निश्‍चित आहे; मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच त्याचे यश-अपयश मोजले जाईल आणि त्यानंतरच मग श्री. पाटील यांची वाटचाल ठरणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT