VILASKAKA PATIL SATARA
VILASKAKA PATIL SATARA 
ब्लॉग

विलासकाकांनी काॅंग्रेसशी एकनिष्ठ राहून चूक केली?

संभाजी थोरात

आपल्या एका चालीने अनेकांना चितपट करणारा महाराष्ट्राच्या राजकीय पटावरील वजीर काळाच्या पडद्याआड गेला. सातारा जिल्ह्यातील राजकारणातील विलासकाका पाटील उंडाळकर पर्व त्यांच्या निधनाने संपलं. एखाद्या चित्रपटाच्या हिरोप्रमाणे आयुष्य जगणारया विलासकाकांनी पन्नास वर्षाच्या राजकारणात हुजरेगिरी - मुजरेगिरी कधीच केली नाही.

ज्या उंडाळे गावातून त्यांचा प्रवास सुरू झाला तेथील 1962 च्या परिस्थितीची कल्पना केली तरी हा भाग किती मागास असेल याचा अंदाज येतो. पाणी, रस्ता, शाळा यांचा पत्ताच नव्हता. विलासकाका यांचे वडील जरी स्वातंत्र्यसैनिक असले तरी घरची आर्थिक स्थिती विशेष चांगली नव्हती. अशाही परिस्थितीत राजकारणात करियर करायचा विचार करणारयाला आजच्या काळात वेड्यात काढलं जाईल. पण अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत विलासकाकांनी आपली राजकीय सुरवात केली.

यशवंतराव चव्हाण यांचे बोट धरून राजकारणाचे धडे त्यांनी गिरवले. जिल्हा परिषद, जिल्हा काॅंग्रेस समिती, जिल्हा बॅक अशा ठिकाणी पाय रोवत त्यांनी विधानसभेपर्यंत कशी मजल मारली हे अनेकांना कळालं नसेल. अनेक जण विधानसभेला निवडून आले की आपल्या मतदारसंघाच्या बाहेर विचार करत नाहीत. विलासकाकांनी जिल्हाभर माणसं जोडली. याच माणसांच्या ताकदीवर जिल्हा भरातील दिग्गज  नेते मंडळींना आपल्या धाकात ठेवले. काकांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेवर कायम आपले वर्चस्व ठेवले. सलग 53 वर्षे ते जिल्हा बॅकेचे संचालक आहेत. हा विश्वविक्रम असेल. एखादी बॅक कशी चालवावी याचं आदर्श उदाहरण म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅक आहे. काका सातारयात राहायचे पण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावागावातील घडामोडी काकांपर्यंत लगेच पोहचायच्या. त्यांची `डिनर डिप्लोमसी` हा पीएच. डीचा विषय होऊ शकतो. ज्याकाळात फोन, गाडी अशी साधने कमी होती त्याकाळात काकांचा संपर्क थक्क करणारा होता. राजकारण करताना बाहुबलींच्या जीवावर राजकारण केले जाते. पण काकांनी थेट सामान्यांपर्यंत संपर्क ठेवून बाहुबलींना आपल्यावर अवलंबून ठेवले.

विधानसभेला आपल्यासमोर कोण उमेदवार असावा, हेही काकाच ठरवतं असतं. कुणाची कोणती नस दाबली की तो जागेवर येईल हे त्यांना पक्के ठाऊक होते. ते सदैव लोकहिताचा विचार करायचे. मंत्री असताना कॅबिनेटमध्ये थेट मुख्यमंत्र्यांनाच त्यांनी अनेकदा विरोध केला. अशा वागण्याचा त्यांना त्रासही सहन करावा लागला. ज्या काॅग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ राहीले. त्या पक्षानेही त्यांच्यावर अन्याय केला. एवढ्या मोठ्या नेत्याला प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी झुंजावं लागलं. अनेकदा मुख्यमंत्रीपदासाठी नाव पुढं आलं पण कुणापुढं हात पसरायची सवय नसल्याने त्या पदानंही त्यांना हुलकावणी दिली. इतका काळ आमदार  राहुनही त्यांना योग्य मंत्रीपद मिळाले नाही. काकांच सगळं करिअर बघितलं तर एकनिष्ठ राहणं ही चूक झाल्याचे जाणवते. हा अन्याय त्यांच्या बोलण्यातून पुढं यायचा पण तरीही त्यांनी आपल्या तत्वांशी प्रतारणा केली नाही. गोरगरिब जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कायम काम केलं. भागाचा विकास आपण दीर्घकाळ सत्तेत असल्यामुळेच झाल्याचं ते सांगायचे. कितीही संकट आली तरीही ते कायम अजिंक्य होण्यासारखे योद्ध्यासारखे जगले. राजकारणात करियर करू पाहणारया  प्रत्येकाने विलासकाकांच्या राजकारणाचा अभ्यास जरूर केला पाहिजे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT