ब्लॉग

शेतकरी दिंडी: आंदोलनाच्या नेतृत्वाचा वारसा अन वसा

कैलास शिंदे, जळगाव

विठ्ठल हे महाराष्ट्राच दैवत श्रध्दास्थान. महाराष्ट्रातील शेतकरी,कामकरी, सामान्य लोक दिंड्या पताका घेवून पंढरपूरला त्यांच्याजवळ जातात. शेती पिकून धनधान्य यावे सासाठी प्रार्थना करतात. शांततेच्या मार्गाने निघणाऱ्या याच दिंड्यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्‍न सरकारदरबारी मांडून ते सोडविण्यासाठी आंदोलने करण्यात आली ती यशस्वीही झाली आहेत.

माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार यांनी शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्‍नासांठी 1980 मध्ये 'जळगाव ते नागपूर' अशी दिंडी काढली होती. ती यशस्वीही झाली होती. तब्बल 37 वर्षानंतर त्याच प्रश्‍नावर दिंडी काढण्यात येत आहे. यावेळी मार्ग 'यवतमाळ ते नागपूर' असा आहे. पवार यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या दिंडीचे नेतृत्व आहे.

सन 1980 मध्ये राज्यात शेतकऱ्यांच्या, कामकऱ्यांचे प्रश्‍नावर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 'जळगाव ते नागपूर' अशी शेतकरी दिंडी काढण्यात आली होती. जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानातून 7 डिसेंबर 1980ला या दिंडींस प्रारंभ झाला होता. तब्बल 455 किलोमीटरचा प्रवास करून ही दिंडी नागपूर येथे पोहोचली होती. त्यावेळी (कै.)यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासह अनेक नेते नागपूर येथे मोर्चात सहभागी झाले होते. त्यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती. या शेतकरी दिंडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते.

तब्बल 37 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली नागपूर हिवाळी अधिवेशनावर दिंडी काढण्यात आली आहे. यावेळी या आंदोलनाला 'हल्ला बोल' असे नाव देण्यात आले असून 'यवतमाळ ते नागपूर' असा मार्ग आहे. जळगाव ते नागपूर दिंडीत शरद पवार यांनी संपूर्ण पायी प्रवास केला होता. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार नागपूरपर्यंतच्या दिंडीत पायी प्रवास करणार आहेत. नागपूर येथील दिंडीत त्यावेळी (कै.) यशवंतराव चव्हाण सहभागी झाले होते. यावेळी शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेतेही सहभागी होणार आहेत. शेतकरी दिंडीचा हा वसा पवारांच्या पुढच्या पिढीकडे आला आहे.

पवारांनी राज्यातील त्यावेळच्या समाजवादी, राष्ट्रीय स्वयसेंवक संघ, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना त्यावेळी एकत्रीत करून आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखविली होती. देशभरात शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांचे समोर आले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर एकत्र येवून सरकारला हादरवता येते, हेच त्यावेळी दिसून आले होते. देशभरातील राजकारण ढवळून निघाले होते. याच दिंडींचा आदर्श घेवून पुढे चार महिन्यांनी दिल्लीत देशातील शेतकऱ्यांची 'किसान रॅली' आयोजित करण्यात आली होती. त्याच नेतृत्वही शरद पवार यांनीच केले होते.

त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या नेतृत्वाखाली सरकार हादरले होते. यावेळी भाजप व शिवसेना युतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर काय परिणाम होणार याकडेच लक्ष आहे. 'हल्ला बोल'मोर्चा यशस्वी झाल्यास आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीतील खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे नेतृत्वही उजळून निघणार आहे एवढे मात्र निश्‍चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT