Kanhaiya Kumar, Hardik Patel and Jignesh Mevani
Kanhaiya Kumar, Hardik Patel and Jignesh Mevani  File Photo
ब्लॉग

हार्दिक, कन्हैया, जिग्नेश काँग्रेससाठी नवसंजीवनी!

प्रकाश पाटील

कन्हैया कुमार, जिग्नेश, हार्दीक या त्रिकुटाचा काँग्रेस पक्ष कसा उपयोग करून घेतो. या तिघांचे मन कॉंग्रेस संस्कृतीत रमेल हेही पाहावे लागेल. देशात क्रेझ आहे असे पक्षाबाहेरील तरुण नेते काँग्रेसमध्ये येत आहेत. राहुल गांधींवर विश्वास ठेवत आहेत हा पक्षासाठी कुठे तरी आशेचा किरण आहे.

२०१४ पासून म्हणजेच नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यापासून काँग्रेसला काही 'अच्छे दिन' आले नाहीत. अपवाद मध्यंतरीच्या पाच राज्यांच्या निवडणुकीत मिळालेले यश. या यशाने पक्षानं थोडं बाळसं धरलं होतं. पण, ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केली आणि मध्य प्रदेशसारखं महत्त्वाचं राज्यही हातून गेलं. शिंदे हे तसे फर्डे वक्ते आहेत. राजस्थानमधील सचिन पायलटही तसेच आहेत. या दोघांना वाटत होतं की राहुल गांधी आपल्याला मुख्यमंत्री करतील म्हणून. तसं मात्र झालं नाही. त्यांनी कमल नाथ आणि अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केल्याने हे दोन्ही नेते नाराज होते. शिंदे भाजपत गेले. अद्याप पायलट पक्षात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही नाराज आहेत. तसं पाहिलं तर काँग्रेसला अच्छे दिन केव्हा येतील हे आज सांगता येत नसले तरी प्रत्येक पक्षाला कधी ना कधी तरी खाचखळग्यातून जावे लागतेच.

यापूर्वीही काँग्रेससमोर संकटं आलं नाहीत असं नाही. पण या पक्षाने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घेतली. आज तर हा पक्ष पुन्हा अनेक संकटांना सामोरे जाताना दिसत आहे. पंजाबसारखे महत्त्वाचे राज्य हातात असताना तेथेही प्रचंड नाराजी आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. ज्या कॅप्टन यांनी भाजपपुढे नेहमीच आव्हान उभे केले. तेच भाजपकडे चालले असतील तर याला काय म्हणावे. राहुल गांधी तुलनेने राजकारणात तरूण आहेत. त्यांच्या मागे तरूणांची फळी उभी राहील, असे चित्र होते. तसे चित्र मात्र गेल्या सहा-सात वर्षांत दिसत नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे आजही तरूणांची ताकद दिसून येते. मोदींचे आकर्षण अद्याप तरी कमी झालेले दिसत नाही. असो.

मुद्दा असा आहे की एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जवळजवळ सत्तरीच्या पुढे गेले आहेत. त्यांची जागा आता नव्या दमाच्या म्हणजे तरूणांनी घेतली पाहिजे. वर्षानुवर्षे सत्तेला चिकटून राहिलेले आणि सगळी सत्ता आपल्याच घरात हवी अशी मानसिकता या पक्षातील नेत्यांची आजही बदलत नाही. पक्ष खड्ड्यात गेला तरी चालेल पण आपल्याकडे सत्ता हवी, असं या पक्षातील बहुंताशी नेत्यांना वाटत असतं. पक्षातील तरूण नेते बाहेर पडले आहेत. ज्येष्ठ नाराज आहेत. अशा परिस्थितीत ज्या तरूण नेत्यांची देशात क्रेझ आहे असे काँग्रेस पक्षाबाहेरील नेते पक्षामध्ये येत आहेत. राहुल गांधीवर विश्वास ठेवत आहेत हा काँग्रेससाठी कुठे तरी आशेचा किरण आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यापूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, कन्हैयाकुमार या त्रिकुटाने नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून हल्ला चढविला होता. खरं तर फायरब्रँड नेतेच हे. तरूणपिढी काही प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित झाली होती. कन्हैयाकुमार आणि हार्दिक तर असे नेते आहेत की त्यांच्या सभांना गर्दी जमवावी लागत नाही. हार्दिकपाठोपाठ कन्हैया काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. जिग्नेश यायचे आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसने त्यांचा पुरेपूर फायदा उचलला पाहिजे. जर काँग्रेसकडे पाहिले तर आज असे लक्षात येते की, मोदी सरकारविरोधात ब्र काढण्याची या पक्षातील भल्याभल्या नेत्यांमध्ये (चिंदबरंम आणि मोजकेचे नेते सोडले तर) हिंमत नाही . आपल्यामागे ईडी, सीबीआयचे शुक्लकाष्ट लागेल या भीतीने कोणी टीकाही करीत नाही.

राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी ते न डगमगता भाजपविरोधात नेहमीच डरकाळी फोडत असतात. जर ते घाबरले असते तर काँग्रेस अजून खिळखिळी बनली असती. कन्हैयाकुमार, जिग्नेश, हार्दिक या त्रिकुटाचा काँग्रेस पक्ष कसा उपयोग करून घेतो? या तिघांचे मन काँग्रेस संस्कृतीत रमेल? हेही पाहावे लागेल. या पक्षातील घराणेशाही भल्याभल्यांना पुढे येऊन देत नाही. जर हे त्रिकुट पक्षात रमले. त्यांना संधी दिली तर काँग्रेसच्या या मुलुखमैदानी तोफा गरजतील. काँग्रेसही प्रचारात आघाडी घेऊ शकतो. भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला टक्कर देऊ शकतो. शेवटी राजकारणात गरजावे लागतेच. पश्चिम बंगालची वाघीण जर डरकाळी फोडत राहिली नसती तर तेथे आज कमळ फुललेले दिसले असते. ममता बॅनर्जी यांनी भाजपशी दोन हात करीत दणदणीत विजय मिळविला होता.

यापूर्वी राहुल गांधी यांनी पाच राज्यात सत्ता खेचून आणलीच होती. मात्र, पक्षातील बंडाळीमुळे काँग्रेसला जोरदार फटका बसला. काँग्रेस हा समुद्रासारखा पक्ष आहे. येथे भरती आहोटी ही येणारच. आज जिग्नेश, कन्हैयाकुमार आलेत भविष्यात त्यांच्यासारखे नेते पक्षात येऊ शकतात. येणारच नाहीत असे नव्हे. काँग्रेस पक्ष संपला असे काही म्हणता येणार नाही. शेवटी या पक्षालाही परंपरा आहे ती नाकारता येणार नाही.

येथे शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जरी कन्हैया, जिग्नेशसारखे नेते पक्षात आले तरी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करताना मर्यादा राखली पाहिजे. अगदी खालच्या पातळीवर टीका करणे योग्य होणार नाही. काँग्रेसच्या संस्कृतीचे भान त्यांनी राखले पाहिजे. देशाचा ध्वज, देशभक्ती याचा विचार करताना यापूर्वी केलेली टीकाही लक्षात घेऊन स्वत:त बदल केला तर लोकही त्याचे स्वागत करतील. विशेषत: कन्हैयाकुमार हे फर्डे वक्ते आहेत. त्यांची भाषेवर उत्तम पकड आहे. काँग्रेससाठी ते वातावरणनिर्मिती करू शकतात. त्याचा फायदा काँग्रेस कसा घेते हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT