ब्लॉग

ड्रायव्हिंगचा शौक..पोहे.. आणि हिंदी गाणी...! आवडी फडणवीसांच्या

प्रसन्नजीत फडणवीस

देवेंद्र जरी आज मुख्यमंत्री असला, बिझी दिसत असला आणि गंभीर वाटत असला तरी, त्याचा मूळ स्वभाव खूप वेगळा आहे. मिश्‍कील आहे तो. गप्पांची मैफल रंगवावी तर त्यानेच. किस्से सांगत, गाणी म्हणत बोलता-बोलता कोणाचीही टोपी सहज उडविण्याची कला त्याला लहानपणापासूनच अवगत होती. गाण्याच्या भेंड्यांमध्ये देवेंद्र ज्या टिममध्ये ती जिंकणारच. देवेंद्रला 8 मामा, 4 आत्या, 5 काका. एवढा मोठा गोतावळा पण, सगळ्यांना देवेंद्रच हवाहवासा वाटतो. आम्ही अजूनही जेव्हा भावंड भेटतो तेव्हा रात्री दहा-अकराला सुरू झालेल्या गप्पा पहाटे चार वाजेपर्यंत चालतात. मात्र, सकाळी साडेसात वाजता उठून हा दौऱ्यालाही रवाना झालेला असतो अन आम्ही झोपलेलेच असतो. 

हिंदी नवी- जुनी गाणीही त्याला खूप पाठ आहेत. अजूनही वेळ मिळाला की, तो आवर्जुन गाणी ऐकतोच. कवितांची आवड, चांगला ऐकायच- वाचायच, ही त्याची आवड. त्याच्यात ना एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व आहे. कोठेही सहज मिसळून जाणारा. 

देवेंद्र हा खवय्या देखील आहे. पोहे हा त्याचा विक पाईंट. सामोसे, बाकरवडी, भेळ, भजी असे चमचमीत पदार्थत्याला मनापासून आवडतात. नॉन व्हेजची फारशी आवड नसली तरी, ते वर्ज्य नाही. त्याचे सगळेच मामा ओव्हरवेट. तसाच देवेंद्रही. आता त्याने बरेच वजन कमी केले. पण 120 किलोपर्यंत तो पोचला होता. त्यामुळे शोभेल असेच कपडे घालण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. 

नागपूरमधील धरमपेठमधील त्याच्या घरासमोरच संघाची शाखा भरायची. तेथे जायचा. पुढे अभाविप आणि भाजयुमोमध्ये तो पोचला. मित्र जमवून हिंडा-फिरायची आवड असल्यामुळे मित्रांमध्येही तो 'पॉप्युलर' आहे. बुलेट चालविण्याची त्याला मोठी आवड आहे. तसेच कार, जीप चालविण्याचीही. घरात सुमो, बोलेरो गाडी असायची. तेव्हा खूप वेळा त्याने नागपूर- शिर्डी- शनिशिंगणापूर दौरा करायचा. संपूर्ण प्रवासात स्वतः ड्रायव्हिंग करण्याची त्याची हौस असायची. देवेंद्र धार्मिकपण आहे. देवापुढे नतमस्तक व्हायचा त्याचा स्वभावच आहे. 

जरी नागपूरमध्ये असायचा तरी वेळ मिळाला की तो पुण्यात अगदी लहानपणापासून यायचा. सायकल काढून आम्ही भरपूर फिरायचो. दहावीच्या व्हॅकेशन क्‍लाससाठी तो सुमारे अडीच महिने पुण्यात होता. तेव्हा सहकारनगरमधून 37 नंबरच्या पीएमटी बसमधून प्रवास करायचा. एसपी कॉलेजजवळून तो चालत जायचा. 

खरे तर त्याला बॅरीस्टर व्हायचे होते. म्हणून त्याने बारावीनंतर लॉ कॉलेजला नागपूरमध्ये अॅडमिशन घेतली होती. पण, राजकारणात कधी पोचला, हे त्याचे त्यालाच समजले नाही. हरहुन्नरही असलेल्या देवेंद्रचे अरेंज मॅरेज आहे, याचे देखील अनेकांना नवल वाटते. हसत-खेळत आयुष्य जगायच, हे त्याचं व्रत! 

राजकारणात असूनही त्याचा स्वभाव राजकारणी नाही. त्याच्यात जाणीव खूप आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातील मीरा नृसिंहपूर येथे आमचे कुलैदवत. पूर्वी तेथे जायचो तेव्हा एका चहाच्या गाडीवर चहा घ्यायचो. मुख्यमंत्री झाल्यावर त्या भागात गेल्यावर त्याने आवर्जुन त्या गाडीवरच जाऊन चहा घेतला आणि आठवणींना उजाळा दिला. 

कोणी मदत केली तर, त्याची सातत्याने जाणीव ठेवण्याच्या स्वभावामुळे अनेकजण त्याच्याशी जोडले गेले. झऱ्यासारखा पारदर्शक स्वभाव असल्यामुळे आणि हाती घेतलेले काम जवाबदारीने पूर्ण करण्याचा स्वभाव असल्यामुळे त्याच्यावर पक्षाने टाकलेल्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये तो यशस्वी झाला. भविष्यातही त्याला आणखी यश मिळो, हिच वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला मनापासूनची शुभेच्छा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT