राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री कै. यशवंतराव चव्हाण हे अतिशय उदारमतवादी, लोकशाहीवादी आणि गोरगरिबांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून यावी, यासाठी आयुष्य खर्ची घातलेले व्यक्तिमत्त्व. गोरगरीब शेतकऱ्यांचे हित हा यशवंतरावांच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाचा पाया होता, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांनी आयुष्यभर बेरजेचे राजकारण केले. विरोधकांचे मत अमान्य असले तरी त्याला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे, असा उदार रॉयवादी दृष्टिकोन त्यांनी आयुष्यभर बाळगला. यशवंतरावांनी आयुष्यभर सहकारक्षेत्र मजबूत व्हावे, यासाठी अथक प्रयत्न केले. त्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळाची शुद्धी करण्याची मोहीम राजू शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी अचानक कशी घेतली, याविषयी राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
अर्थात यशवंतराव चव्हाण आणि राजू शेट्टी यांची कधीच तुलना होणार नाही. चव्हाण यांनी जितक्या संस्था उभारल्या आणि जी तत्त्वे जोपासली त्याच्याशी राजू शेट्टी यांची तुलनाच होणार नाही. राजू शेट्टी यांनी किती संस्था उभारल्या हा संशोधनाचाच विषय आहे. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुद्धीकरणाचा जो प्रयत्न केला, त्यावरून राजू शेट्टी यांना त्यांचे वारसदार व्हायचे आहे की काय हे कळत नाही पण अशा प्रयत्नांनी चव्हाण यांचे वारसदार त्यांना होता येणार नाही हे नक्की.
"स्वाभिमानी'ची नवी वर्णव्यवस्था...
आजपर्यंत देशात अस्तित्वात असलेली वर्णव्यवस्था व तिचे दुष्परिणाम संपुष्टात आणण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले आहेत. मात्र, ही वर्णव्यवस्था व तिच्यातील वाईट गोष्टी संपलेल्या नाहीत असे असताना आता नवी वर्णव्यवस्था तयार होणार का? आणि तीदेखील राजकीय क्षेत्रात का? असा प्रश्न स्वाभिमानी संघटनेला विचारावा लागेल. कारण या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच कृत्य केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधील समाधिस्थळाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण केले आहे. या कार्यकर्त्यांनी गोमूत्र व कृष्णेच्या पाण्याने समाधिस्थळाचे शुद्धीकरण करून राजकारण्यांनी हे स्थळ अपवित्र केले होते, असा युक्तिवाद केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडमधील समाधिस्थळाला भेट दिली, त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे काम केले आहे. त्यातही या कार्यकर्त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. आपण हे केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधासाठी केले आहे असे वाटू नये तर अन्य राजकारणी मंडळींनीही या समाधिस्थळाला भेट देऊन ती अपवित्र केली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, त्यांनी अन्य राजकारण्यांचे नाव घेतलेले नाही. ही घटना घडल्यावर या संघटनेचे नेते आणि सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी ही गोष्ट चुकीची झाल्याचे अजूनतरी स्पष्ट केलेले नाही. आता टीका झाल्यावर मला न विचारता कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले, असा पवित्रा ते घेऊ शकतात. खरंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी काही महिन्यांपर्यंत याच फडणवीस यांच्याबरोबर वावरत होते, अगदी शेतकरी आंदोलनात सदाभाऊ खोत यांना समस्या सोडवल्याचे श्रेय मिळू नये म्हणून अपरात्री फडणवीस यांना गुप्ततेने भेटण्याचे राजकीय कौशल्य दाखवले होते. त्याच संघटनेच्या कार्यकर्त्यांना फडणवीस यांच्यामुळे समाधी अपवित्र झाली हा साक्षात्कार कसा काय झाला? आणि फडणवीस अपवित्र असतील तर त्यांच्याबरोबर वावरलेल्या राजू शेट्टी यांना पवित्र करून घेण्यासाठी आता हे कार्यकर्ते काय करणार?
मुळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल अचानक एवढे प्रेम यायचे कारण काय? यशवंतराव चव्हाण यांनी जी तत्त्वे जपली त्याचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काहीही संबंध नाही. यशवंतरावांचा हिंसेवर बिलकूल विश्वास नव्हता, त्यांचा भर रचनात्मक कामावर होता. इथे संघटना ऊसदरासाठी आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलन करताना ज्या पद्धतीने जाळपोळ आणि हिंसक मार्गाचा अवलंब करते, त्याचा आणि यशवंतराव चव्हाण यांनी जपलेल्या मूल्यांचा काहीएक संबंध नाही. संघटनेच्या आजपर्यंतच्या अधिवेशनात कधी यशवंतरावांच्या प्रतिमेला वंदन केल्याचे ठळक उदाहरण तरी नाही.
तरीही समाधी अपवित्र झाली असा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी युक्तिवाद करणे म्हणजे संघटनेला नवी वर्णव्यवस्था निर्माण करायची इच्छा असावी असे दिसते. ""आम्ही म्हणू ते नेते थोर, आम्ही म्हणू ते पवित्र, आम्ही सांगितले की कुणी पवित्र आणि आम्ही सांगितले की ते अपवित्र,'' असा या संघटनेचा खाक्या दिसतोय. मुळात पवित्र आणि अपवित्र असे काही नसते आणि राजकारणाच्या रणधुमाळीत तर नाहीच नाही. सवंग प्रसिद्धीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. हा सांस्कृतिक आणि जातीय दहशतवाद तर आहेच; पण नवे ब्राह्मण्य, व्यापक अर्थाने सांगायचे झालं तर नवी वर्णव्यवस्था उभी करायचा हा प्रयत्न आहे आणि समाजात फूट पाडण्याचा निर्लज्ज प्रकार आहे. या कार्यकर्त्यांनी असले घाणरडे कृत्य करून नवा ब्राह्मण्यवाद निर्माण करायचा प्रयत्न तर केला आहेच; पण आयुष्यभर कोणतीही जातीयवादाची उतरंड न पाळणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांचा मोठा अपमान केला आहे.
पवित्र आणि अपवित्र, स्पृश्य आणि अस्पृश्य असा भेद ज्या यशवंतराव चव्हाण यांनी उभ्या आयुष्यात कधी पाळला नाही, त्याच्या समधिस्थळापाशी असला प्रकार करावा, यांसारखा विनोद तर आहेच पण ही त्यांच्या विचारांची पायमल्ली आणि एकप्रकारे हत्याच आहे. मुळात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे इतके प्रेम कुठून आले. मुळात ही संघटना ज्या कॉंग्रेसला सतत विरोध करत असते तसेच अत्यंत घाणेरड्या भाषेत या पक्षाचा आणि या पक्षाच्या नेत्यांचा शिवराळ भाषेत उद्धार करणारे या संघटनेचे अनेक कार्यकर्ते एकदम या समाधीबद्दल इतके हळवे कसे झाले. स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी किंवा राजू शेट्टी यांनी कधी यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी केल्याचे किंवा त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केल्याचे ठळक उदाहरण नाही. या कार्यकर्त्यांना जर यशवंतराव चव्हाण यांचे खरे प्रेम असते तर त्यांच्या आयुष्यावर निघालेला चित्रपट या संघटनेने गावोगावी दाखवला असता; तसेच त्यांची पुस्तके आपल्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यासाठी विकत घेऊन वाचली असती, लोकांना वाचायला दिली असती. अशी कुठलीही पार्श्वभूमी नसताना ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले ते म्हणजे दुसऱ्या संघटनेचे आदर्श व्यक्ती आपल्या नावावर खपवण्याचा अगदी स्ष्ट शब्दांत सांगायचे झाले तर आदर्शाची चोरी करण्याचाच प्रकार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कधी एखादी शिक्षण संस्था उभारल्याचे उदाहरण नाही किंवा शेतकऱ्यांसाठी एखादी स्थायी संस्था उभारल्याची नोंद नाही. मग असला अगोचरपणा करण्याचा अधिकार या संघटेनला दिला कुणी? यशवंतराव चव्हाण यांची समाधी आपली जहागीर असल्याचा आव आणण्याचे कारणच काय? मागे एकदा माजी मंत्री छगनराव भुजबळ यांनी हुतात्मा स्मारकाचे असेच शुद्दीकरण करायचा फालतूपणा केला होता. राजू शेट्टी म्हणतील मला न विचारता हे झाले आहे तर तो त्यांचा शुद्ध राजकीय कांगावा ठरेल. आपल्या कार्यकर्त्यांना घडवण्यात ते कमी पडले असा या घटनेचा अर्थ आहे. मुळात त्यांनी या घटनेचा परखड निषेध केला पाहिजे, तसेच कुठलाही बोटचेपेपणा न करता या कार्यकर्त्यांना संघटनेतून थेट निलंबित केले पाहिजे तरच त्यांचा या घटनेला पाठिंबा नव्हता असे मान्य करता येईल.
या कार्यकर्त्यांनी हे कृत्य करून आपला समाज आजही कसा ब्राह्मण्यवादाच्या पगड्याखाली आहे हे दाखवून दिले आहे. महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज व राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला समानतेचा मार्ग किती अवघड आहे आणि माणसाला माणूस म्हणून आपण मान्य करण्यात कसे कमी पडत आहोत हेच या घटनेवरून सिद्ध झाले आहे. पवित्र आणि अपवित्राचा घोळ आपल्याला कसा सुटू देत नाही हेच पुन्हा एकदा दिसून आले आहे. खरे तर राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशाप्रकारे अपवित्र मानणे हाच राजकीय अपरिपक्वपणा आहे.
शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी असले शुद्धीकरणाचे उद्योग करण्यापेक्षा शेतकरीहिताचे कार्यक्रम राबवावेत, हेच जास्त योग्य ठरेल आणि शेतकरीहिताचे ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.