ब्लॉग

बहुजनांच्या श्रद्धास्थानाचीच बदनामी का होते ? 

प्रकाश पाटील

"पुढच्याला ठेच मागचा शहाणा' अशी जी मराठीत म्हण आहे. ती खूप चांगली आहे. या म्हणीचा थोडा जरी विचार केला तर कटूप्रसंग वाटेला येणार नाहीत. पण, ही म्हण लक्षात घेतील तर ते लेखक (वादग्रस्त) कसले. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राजकारण आदी जे म्हणून काही क्षेत्र आहे त्यामधील सर्व ज्ञान आपणास प्राप्त झाले आहे. आम्ही लिहिलेला शब्द ना शब्द प्रमाण आहे. असा समज करून घेतलेल्या मंडळींना जेव्हा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते तेव्हा मात्र हे विद्वान, प्रकांडपंडित मंडळी जाहीर माफी मागतात. चूक झाली असे सांगत कोपरापासून हात जोडतात. खरेतर ही हात जोडण्याची वेळ का यावी याचा विचार लिहिण्याअगोदर केला तर बरे होणार नाही का ? पण, लक्षात कोण घेणार ! 

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात सांस्कृतिक दहशतवाद सुरू असल्याची ओरड सुरू आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे अनेक विचारवंत पुढे येत आहे त्याचे स्वागतच केले पाहिजे. पण, ज्या गोष्टीला ठोस पुरावा नाही. त्या गोष्टी रंगवून सांगायच्या. मांडायच्या तरी कशासाठी ? व्यक्तिस्वातंत्र्यांचा पुरस्कार निश्‍चितपणे केला जावा. मात्र दुसरीकडे हीन मनोवृत्तीचं दर्शन जर कोणी घडविणार असेल तर ते का म्हणून सहन करायचे. 

सर्वशिक्षा अभियानाच्या पुस्तकात छत्रपती संभाजीमहाराजांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप झाला. या पुस्तकात संभाजीमहाराजांविषयी काय प्रसिद्ध झाले तो परिछेद माध्यमात आला. हा विषय ताजा असताना आता संत तुकाराम महाराजांच्या पत्नीविषयी असेच चुकीचे प्रसिद्ध झाले. संभाजीमहाराज आणि तुकोबांच्या पत्नीविषयी जी वाक्‍य आली आहेत ती नसती आली तर बरे झाले असते की नाही. 

संभाजीमहाराज हे कोण आहेत. महाराष्ट्राच्या त्यांच्याविषयीच्या भावना काय आहेत इतके साधे भानही लेखिका डॉ. शुभा साठे यांना कसे राहिले नाही ? याचेच आश्‍चर्य वाटते. छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज किंवा संत तुकाराम महाराज इतके स्वस्त आहे का ? की आपण काहीही लिहिले तर चालते. मराठी माणसाच्या हृदयावर कोरलेली ही नावे आहेत. या नावांना कोणी जर धक्का लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते कदापी सहन केले जाता कामा नये. मग ती व्यक्ती कितीही मोठी असो. 

डॉ. साठे या विचारवंत आहेत. लेखिका आहेत. त्यांनी आतापर्यंत विपुल लिखाण केले आहे. शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे हे खरे असले तरी संभाजीमहाराज हे दारूडे होते हा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढला हे कळले नाही. जर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराजांचा इतिहास सांगायचा असेल. त्यांनी घालून दिलेला आदर्श मांडायचा असेल, कथन करायचा असेल तर किमान बुद्धी ठिकाण्यावर ठेवूनच लिखाण करायला हवे होते. संभाजीमहाराज कसे वाईट होते हे सांगण्याचा अधिकार या लेखिकेला दिला कोणी ? आपण काही लिहिले तर आपणास कोणी विचारणारे नाही असा समज त्यांनी बहुधा करून घेतलेला असावा. 

वर्षानुवर्षे साहित्य क्षेत्रात लिखाण करणाऱ्या मंडळीविषयी समाजात आदर असतो. चांगले साहित्य, लेखन कोणालाही भावते. पण, चुकीचे आणि दिशाहीन लेखनाचे समर्थन केलेच जाईल असे समजण्याचे कारणही नाही. जी मंडळी दुसऱ्याची बदनामी करतात त्यांच्या पूर्वजांना जर असे कोणी दारूडे म्हटले तर चालणार आहे का ? 

एखादी लेखिका काही लिहिते. थोर पुरुषांचा अवमान करते. पुस्तक बाजारात येते. इतकेच नव्हे तर ते विद्यार्थ्यांना शिकविले जाते. तरीही सरकारच्या शिक्षण खात्याला आणि या खात्यातील वरिष्ठांना जाग कशी आली नाही. चूक कोणी तरी दाखवून दिली ते खडबडून जागे होतात. वास्तविक पुस्तक काय आंधळेपणाने प्रकाशित केले जाते का ? सरकारने अशी पुस्तके प्रकाशित करण्यासाठी जबाबदार व्यक्तींची नियुक्ती केलेली असते. संपादक असतात. थोर पुरुषांची बदनामी पुस्तकात होते. मग, हे अधिकारी काय झोपा काढत होते की काय ? संभाजीमहाराज, संत तुकाराम महाराजांची ज्यांनी बदनामी केली आहे. त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे. या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला तरच ही मंडळी सरळ होतील. 

यापूर्वी काय रामायण घडले होते याचे भान खरेतर लिखाण करताना बाळगायला हवे होते. यापूर्वी जेम्सलेन प्रकरण असेल किंवा ज्येष्ठ लेखक आनंद यादव यांचे संत तुकारामांविषयी वादग्रस्त लिखाण असेल. या दोन्ही घटनांनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. यादव यांच्यावर तर वारकरीही चिडले होते. वाईच्या संमेलनाध्यक्षपदावर यादव यांना पाणी सोडावे लागले. पुस्तकही मागे घ्यावे लागले. हा ताजा इतिहास असताना पुन्हा पुन्हा त्याच चुका तरी कशा होतात. 

थोर पुरुष मग ते कोणत्याही समाजाचे असोत. त्यांच्याविषयी लिखाण करताना थोडं डोकं ठिकाणावर ठेवूनच लिहिले पाहिजे. लेखकांना लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणून काहीही लिहून चालणार नाही आणि जे लिहिलेले आहे ते योग्य आहे. चुकीचे काही नाही. ठोस पुरावा असेल तर घाबरण्याचेही कारण नाही. पण, तसे होत नाही. 

वादग्रस्त लिखाणामुळे समाजात संघर्ष उभा राहतो. जातिधर्मांत तेढ निर्माण होते. लोकांच्या भावनांना ठेच लागते. याचा विचार लेखकांनी करतानाच समाज कसा गुण्यागोविंदाने नांदेल हे पाहिले पाहिजे. समाज जागृती आणि प्रबोधनावर त्यांनी भर द्यायला हवा. बहुजन समाजाची जी म्हणून श्रद्धास्थान आहेत त्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जाते हा समज होऊ नये यासाठी खबरदारी ही घेतलीच पाहिजे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT