1956 साली मी 20 वर्षाचा होतो. त्यावेळी माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माझ्या बहिणीला तिचे नवऱ्याने तोंडी तलाक दिला. मनात आले की तलाक दिल्याने पुढे काय होते. त्या साऱ्या कुटुंबाला किती अडचणींचा सामना करावा लागतो याचा अनुभव मी स्वत: घेतलाय. त्या क्षणापासून तोंडी तलाकविरोधात लढण्याची प्रतिज्ञा केली. मुस्लीम धर्मबांधवांमध्ये सुधारणा व्हाव्यात योग्य-अयोग्याचे भान त्यांना यावे, यासाठी हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली 22 मार्च 1970 ला मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. समीर शेख, मकबूल तांबोळी, बशीर शेख यांच्यासह काही सहकारी सोबत होते. मंडळाच्या माध्यमातून हमीदभाईंच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागलो. तलाकविरोधी कायदा करावा व्हावा, यासाठी गेल्या 45 वर्षात अनेक आंदोलने केली. सरकार दरबारी हेलपाटे घातले. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अखेर मोदी सरकारने हा कायदा केला. हमीद दलवाईंसोबत केलेल्या कामाला, अशाप्रकारे यश मिळाले, सय्यदभाई सांगत होते.
सय्यद मेहमूब शहा कादरी हे त्यांचे पूर्ण नाव असले तरी सय्यदभाई या नावानेच ते पुण्याला आणि राज्याला परिचित आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.आयुष्यभर एका निष्ठेने काम करणाऱ्या व्रतस्थाच्या कामाची दखल सरकारने घेतली. त्यांना पद्मश्री मिळाल्याची समाजात चांगली प्रतिक्रिया उमटली. पुण्याच्या सार्वजनिक जीवनात सय्यदभाईंचा वावर मोठा आहे. मुस्लीम समाजातील शोषित वर्गासाठी त्यांनी केलेल्या कामाची पावतीच सरकारने या पुरस्काराच्या रूपाने त्यांना दिली. पुण्यात सध्या कोंढवा येथे कुटुंबियांसमेवत ते राहतात. आजही कोळशाच्या वखारीत बसतात. वयाच्या 13 व्या वर्षी या कामाला त्यांनी सुरवात केली. पुण्यातील त्यावेळचे कोळश्याचे व्यावसायिक तात्यासाहेब मराठे यांच्या कोळश्याच्या वखारीत हा 13 वर्षाचा मुलगा स्वच्छतेचे काम करू लागला. कामातील प्रामाणिकपणा पाहून मराठे कुटुंबियांनी त्यांना आपलेसे केले. मराठे यांच्या निधनानंतरदेखील ही वखार त्यांच्या कुटुंबियांनी सय्यदभाईंनाच चालवायला दिली.
पुणे-मुंबई रस्त्यावर वाकडेवाडीत ही वखार त्यांनी सलग पन्नास वर्षे चालविली. काही वर्षांपूर्वी मूळ जागा मालकाला (कोणताही हक्क न सांगता) वखारीची जागा परत करून कोळशाची वखार कोंढव्यात हलविली. आपल्या आयुष्यात मराठे कुटुंबाचे फार मोठे उपकार आहेत, असे ते मोठ्या मनाने सांगतात. व्यवसाय आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे काम करताना अनेक अडचणी आल्या. खासगी आयुष्यातही अनेक चढउतार आले. मात्र, चळवळीचे काम आणि कामातील प्रामाणिकपणा कधी सोडला नाही. वयोमानाने गेल्या दहा वर्षात सय्यदभाई फारसे सक्रिय नसले तरी आधीच्या पिढीने त्यांचे काम जवळून पाहिले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी पद्मश्रीने सन्मानित झाल्याचा आनंद आणि कृतज्ञता त्यांच्या चेहऱ्यावर झळकतेय. याच आनंदात त्यांनी गेल्यावर्षी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची आठवण मोठ्या उत्साहाने सांगितली. हे सांगताना तोंडी तलाकविरोधी कायदा झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. सय्यदभाई म्हणाले, "" गेल्यावर्षी 10 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. भेटीसाठी केवळ चार मिनिटे दिली होती. मात्र, बोलायला लागल्यानंतर पंतप्रधान तब्बल 20 मिनिट बोलले. तोंडी तलाकबंदी करा, कोणत्याही धर्माचा आधार न घेता मानवी मूल्यांवर आधारलेला समान नागरी कायदा आणा या दोन प्रमुख मागण्या निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याकडे केल्या. इतर काही मतभेद असले तरी माणूस सच्चा वाटला. आपल्या कामाप्रती अत्यंत प्रामाणिक वाटला.''
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.