Mane-Bagal-Sopal.
Mane-Bagal-Sopal. 
ब्लॉग

सोलापुरात 'इंपोर्टेड' नेत्यांमुळे  युतीतील निष्ठावंत अस्वस्थ !

अभय दिवाणजी

सोलापुर : गैरप्रकारावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरुद्ध सातत्याने रान पेटवून राज्यातील सत्तास्थाने पटकाविणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने सध्या या आघाडीतीलच सदस्यांना पक्षप्रवेश देण्याचा सपाटा चालविल्याने पक्षातील निष्ठावंतांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. कॉंग्रेसमुक्त धोरणाचा नारा देत असताना कॉंग्रेसयुक्त सेना-भाजप पक्ष होऊ लागल्यामुळे राज्यभरात अनिश्‍चिततेचे वातावरण पसरले आहे. 

उद्या (रविवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची सांगता होत आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या दौऱ्यात राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याचे संकेत आहेत. 

युतीमध्ये सुरु असलेल्या चित्र-विचित्र अशा'इनकमिंग'बद्दल स्वपक्षीयांबरोबरच सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे. सत्तेवरून ज्यांना हटविण्यासाठी आतूर मतदारांनी सेना-भाजप युतीच्या पारड्यात मताचे दान टाकले, त्यांनाच पुन्हा पक्षात घेऊन आगामी निवडणुकीतील उमेदवार असल्याचा सूर आहे. आगामी निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार या अहमहमिकेमुळे तसेच आपल्यावरील बालंट टळले जावे, ही भावना असल्याने सेना-भाजप पक्षप्रवेश करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. 

दस्तुरखुद्द विरोधी पक्षनेत्यालाच पक्षात प्रवेश देत मुख्यमंत्र्यांनी राजकीय खेळी खेळल्याने राज्यात तगडा विरोधी पक्षच राहिला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधील नेते हतबल झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. सेना-भाजपचा वारु रोखण्यात कोणालाही यश येईनासे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. मोहिते-पाटील गटामुळेच माढा लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचा विजय झाला हे त्रिवार सत्य असले तरी ज्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर मोहिते-पाटील यांना विरोध करुन पक्ष-संघटना बांधण्याचे काम केले त्या निष्ठावंतांचा मोठा हिरमोड झाला. 

माजी खासदार व ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली दिसत नाही. सोलापूर जिल्ह्यातील चित्र तर फारच विदारक झाल्याचे सेना-भाजप युतीतील निष्ठावंतांचे म्हणणे आहे. करमाळा तालुक्‍यात सेनेचा आमदार असताना राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्या रश्‍मी बागल यांना सेनेत घेतले गेले आहे. त्यांना उमेदवारी देण्याची कबुलीही दिल्याची चर्चा आहे.

कट्टर विरोधक शिवसैनिक आणि नव्याने प्रवेश केलेल्या बागल गटात सवतासुभा आहे. युतीच्या समीकरणानुसार बार्शीची जागा सेनेकडे असल्याने राष्ट्रवादीचे दिलीप सोपल यांनी शिवबंधन बांधले आहे. आयुष्यभर ज्या सोपलांना विरोध केला त्यांना जर सेनेची उमेदवारी मिळाली तर त्यांच्या प्रचारासाठी रान पेटविण्यासाठी शिवसैनिक पुढे येणार का ? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

माढा विधानसभा मतदारसंघाचे चित्रही काही वेगळे नाही. गेल्या पाच निवडणुकीत आमदारकी मिळविलेल्या बबनदादा शिंदे यांनी त्यांची दिशा अद्यापही जाहीर केलेली नसली तरी लवकरच त्यांचा निर्णय स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीला सोडण्याचा त्यांचा निर्धार झाल्याचा बोलबाला आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असल्याने त्यांना दिशा मिळेनासी झाली आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिलेला असतानाही त्यांनी तो नाकारून राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जुळता सूर साधला. पराभवानंतर मात्र त्यांनी सध्याचे वातावरण वेगळेच असल्याचे सांगत आपली चूक झाल्याची कबुली दिली. हे दोघे बंधू भाजपकडे झुकल्याची चर्चा आहे. पण तेथे मोहिते-पाटील यांचा त्यांना अडसर आहे. 

अक्कलकोट मतदारसंघ हा पारंपरिक भाजपच्या विचारसरणीला मानणारा असतानाही कॉंग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना पक्षात घेऊन त्यांच्या उमेदवारीबाबतचे पिल्लू सोडण्यात आले आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड असतानाही पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेबद्दल निष्ठावंतांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अशा निर्णयांमुळे अनिश्‍चिततेच्या फेऱ्या अडकलेल्या कार्यकर्त्यांची मात्र मोठी अडचण होऊ लागली आहे. 

कॉंग्रेसचे एकेकाळचे निष्ठावंत माजी आमदार दिलीप माने यांनीही नुकतेच शिवबंधन बांधले. त्यांचा मतदारसंघ अद्याप निश्‍चित नसला तरी जमा-खर्चाचा ताळमेळ पाहून प्रचंड हिशेबाचे राजकारण करणाऱ्या श्री. माने यांचा सेनेत काय विचार होणार, याबाबत सच्च्या शिवसैनिकात चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून प्रत्येकवेळी निवडणूक लढविणाऱ्या नागनाथ क्षीरसागर (मोहोळ) यांनी सेनेत प्रवेश केला. उमेदवारी मिळणार अशी अटकळ बांधून त्यांनी कामही सुरू केले. येथील शिवसैनिकातील अस्वस्थता लपून राहिली नाही. 

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ बांधणी करत सेनेच्या जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांची राजकीय दिशा काय राहणार याबाबत सोशल मिडीयावर सातत्याने पोस्ट फिरत असतात. आपण कोणाकडे पक्षात घ्या म्हणून गेलेलो नव्हतो, असे स्पष्ट करीत श्री. भालके यांनी मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT