ShivSena News Sarkarnama
ब्लॉग

Shiv Sena News : शिवसेना शिंदेंची... पण शिवसैनिक कुणाचे?

Thackeray Vs Shinde : ठाकरेंच्या शिवसेनेपासून शिंदेंच्या शिवसेनेपर्यंतचा प्रवास

सरकारनांमा ब्यूरो

संदीप चव्हाण

बाळासाहेब ठाकरे... नुसतं नाव जरी उच्चारलं तरी नजरेसमोर येते ती प्रखर लेखणी, धारदार कुंचला, टोकदार बाण आणि त्यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांची सेना! शिवसेनेच्या शाखा-शाखांत स्थिरावलेली बाळासाहेबांची तेजस्वी प्रतिमा आणि शाखांच्या भिंती-भिंतींवर चितारण्यात आलेला डरकाळी फोडणारा ढाण्या वाघ... ही सारी आयुधं कमी होती की काय, म्हणून त्यात भर घालणारा भगवा झेंडा! ही सारी आयुधं एका जागी एकवटली की, सुरू व्हायची बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अतिविराट सभा...

1966 मध्ये ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेची 2022 मध्ये दोन शकलं झाली आणि ठाकरेंची शिवसेना शिंदेंची झाली, पण बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांना हे मान्य होईल का? बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक शिंदेंच्या शिवसेनेला स्वीकारतील का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती (23 जानेवारी) निमित्त ठाकरेंच्या शिवसेनेपासून शिंदेंच्या शिवसेनेपर्यंतचा प्रवास उलगडणारा 'सरकारनामा'चा विशेष लेख... शिवसेना शिंदेंची... पण शिवसैनिक कुणाचे?

तारीख होती 30 ऑक्टोबर 1966, ठिकाण होतं मुंबईतलं शिवाजी पार्कचं मैदान आणि कार्यक्रम होता... शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा! शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा आणि शिवसेनेच्या ढाण्या वाघानं फोडलेली ही पहिलीच डरकाळी! अरे, आव्वाज कुणाचा? शिवसेनेचा! कोण आला रे कोण आला...? शिवसेनेचा वाघ आला...! अशा घोषणांनी शिवाजी पार्कचा परिसर दुमदुमला आणि ठाकरी शैलीतला पहाडी आवाज शिवसैनिकांच्या काळजाला भिडला. बाळासाहेबांच्या भाषणातलं पहिलंच वाक्य...'महाराष्ट्राला आज खरी गरज आहे ती महाराष्ट्रवादाची! मराठी माणूस आज जागा झालाय. यापुढं तो अन्याय सहन करणार नाही. राजकारण हे गजकर्णासारखं आहे.' या वाक्याचा नाद शिवसैनिकांच्या कानात घुमला आणि मग त्याला दाद म्हणून मैदानात टाळ्यांचा खच पडला.

या सभेनंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेनेचे सैनिक हे एक जिव्हाळ्याचं नातं बनलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजे 19 जून 1966 पासून निर्माण झालेल्या या नात्यानं मग 'एकच नेता एकच मैदान' असं समीकरण बनवलं. 'जिथं बाळासाहेबांची सभा तिथं शिवसैनिक उभा' असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसू लागलं. नाद, गर्जना, डरकाळी, जोष, आवेश, विनोद, उपरोध आणि गांभीर्य अशी अष्टपैलूत्व वाणी ज्या नेत्याच्या मुखातून बरसू लागली तो एकमेवाद्वितीय नेता म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे!

शिवसेनेची राजकीय घोडदौड

आपल्या राजकीय पदार्पणातच शिवसेनेनं ठाण्याचं नगराध्यक्षपद मिळवलं. नंतर परळ पोटनिवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेत पहिला आमदार विराजमान झाला. त्यानंतर मुंबईचा पहिला महापौर हा शिवसेनेचा झाला. शिवसेनेनं ही सारी पदं काबीज केली तेव्हा तिचं राजकीय वय होतं अवघं पाच वर्षे! 1966 ते 1972 या काळात शिवसेना जोमानं वाढली, मात्र 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू झाली आणि तिथून पुढली 10 वर्षे म्हणजे 1985 उजाडेपर्यंत शिवसेनेवर संकटांमागून संकटं कोसळली, पण हार मानतील ते बाळासाहेब कसले आणि त्यांची साथ सोडतील ते शिवसैनिक कसले? 'शेवटी वाघ तो वाघच! ही शिवसेना आहे शिवसेना हिचा नाद नाही करायचा हा वाघ आहे वाघ त्याचा पाठलाग नाही करायचा' अशी डरकाळी फोडत 1985 मध्ये शिवसेनेनं कमबॅक केलं आणि मुंबई महापालिकेवर भगवा फडकवला.

1987 च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत 'गर्व से कहो हम हिंदू है' असं म्हणत शिवसेनेचा ढाण्या वाघ आमदार बनला. मग मात्र या वाघाची डरकाळी शहराशहरात नि गावागावात घुमू लागली. 'गाव तिथं शाखा नि घर तिथं शिवसैनिक' या मोहिमेद्वारे गावोगावी शिवसेनेच्या शाखांची उद्घाटनं होऊ लागली. 1995 उजाडलं आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालं. 1995 मध्ये शिवसेनेचा वाघ थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत जाऊन बसला आणि महाराष्ट्रासह मंत्रालयात एकच आवाज घुमला... अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा! 1995 ते 97 या काळात बाळासाहेबांवर दुःखामागून दुःख कोसळलं. आधी माँसाहेब सोडून गेल्या. नंतर बिंदुमाधव या त्यांच्या मोठ्या मुलाचं अपघाती निधन झालं... पण बाळासाहेब केवळ कुटुंबप्रमुख नव्हते, ते तर शिवसेनाप्रमुख होते. त्यांनी या दुःखातून स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा पक्षकार्यात झोकून दिलं. त्यानंतर पुढील काही वर्षांतच हिंदुस्थानच्या लोकशाहीतलं चौथ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद शिवसेनेला मिळालं आणि शिवसेनेचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष बनले.

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पडल्यानंतर आज त्या जागी जे राम मंदिर उभं राहू शकलं त्यात शिवसेना आणि शिवसैनिकांचा असलेला वाटा कुणीही नाकारू शकणार नाही.'बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे,' अशी डरकाळी फोडणाऱ्या या वाघानं म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावानं हिंदूहृदयसम्राट हे बिरुद धारण करत इतिहास रचला. साहेब म्हणजे बेडर वाघ! काळीज वाघाचं, गर्जना सिंहाची आणि झेप चित्त्याची! बाळासाहेब जिथं उभं राहायचे तिथूनच त्यांच्या सभेला सुरुवात व्हायची. ते म्हणतात ना, 'सिंह जिथं गर्जना करतो तिथंच त्याचा दरबार भरतो.' बाळासाहेब नेहमी म्हणायचे,' शिवसेनेचा भगवा हाती घेणारी स्त्री असो वा पुरुष; जो स्वाभिमानानं जगतो तोच खरा शिवसैनिक, तोच माझा शिवसैनिक!'

बाळासाहेबांनी शिवसेना स्थापनेपासून शेवटच्या श्वासापर्यंत तब्बल 46 वर्षे 5 महिने 17 दिवस म्हणजेच एकूण 16 हजार 960 दिवस मराठी अस्मिता आणि मराठी माणूस याचाच जप केला. तू कुठल्या जातीचा, तू कुठल्या धर्माचा असा साधा सवालही त्यांनी कधी कुणाला केला नाही. भाजीवाला, डबेवाला, पेपरवाला, रिक्षावाला अशी सामान्य कुटुंबातली माणसं त्यांनी शाखाप्रमुखापासून मंत्रिपदापर्यंत नेऊन बसवली. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना अनेक माणसं सोडून गेली. छगन भुजबळ, नारायण राणे इतकंच नव्हे तर त्यांचे पुतणे राज ठाकरे देखील शिवसेना सोडून गेले. अर्थात, बाळासाहेबांनी कुणाला काय दिलं हे त्यांना सोडून गेलेली नेतेमंडळी आज देखील विसरू शकली नसतील. मग त्यांनी स्वाभिमानानं जगायला शिकवलेले त्यांचे कडवट शिवसैनिक त्यांना कसे विसरू शकतील?

R...

बाळासाहेब ठाकरे यांचं महानिर्वाण

शिवसेनेच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी नोंदलं गेलेलं ते वर्ष अखेर उजाडलंच. ते साल होतं 2012... या वर्षीचा दसरा मेळावा काही वेगळाच होता. दरवर्षी दसरा मेळाव्यात व्यासपीठावर झोकात एन्ट्री मारणारा शिवसेनेचा ढाण्या वाघ अचानक पडद्यावर डरकाळी फोडताना दिसला आणि वाघाला लागलेली धाप पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. साहेबांच्या प्रकृतीत चढ-उतार काय सुरू झाला. तिनं साऱ्या हिंदुस्थानलाच घोर लावला. साहेब लवकर बरे व्हावेत, यासाठी सर्वत्र जपजाप्य आणि प्रार्थना सुरू झाल्या. 'मातोश्री'बाहेर उभ्या राहिलेल्या झुंडीच्या झुंडी तिच्या दुसऱ्या मजल्याकडं चिंतातूर नजरेनं पाहू लागल्या. 14 नोव्हेंबरच्या रात्री साहेबांची प्रकृती जरा जास्तच खालावल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग 'मातोश्री'बाहेर एकच गर्दी उसळली, खवळली, बेभान झाली. साहेब एक स्वतःच गर्दीचे दर्दी! त्यांनी आजवर या गर्दीसमोरच तर मैदानंच्या मैदानं गाजवली. एकच नेता एकच मैदान... साहेबांचा शब्द हाच शिवसैनिकांचा प्राण! पण आता हीच गर्दी साहेबांची प्रकृती चिंताजनक असल्याचं ऐकून सैरभैर झाली. तिकडं दिवाळी सणासाठी घरासमोर लावलेल्या पणतीतलं तेल संपलं की न संपलं याकडं पाहायला कुणाला वेळ होता, कारण इकडं घराघरात स्वाभिमानाची मशाल पेटवून तिला प्रज्वलित ठेवणारा अंगार मात्र विझला होता. 17 नोव्हेंबरच्या शनिवारी दुपारी तीन वाजून तेहेतीस मिनिटांनी या वाघाची प्राणज्योत हिसकावून घेत रेड्यावर स्वार होऊन आलेला तो काळतोंड्या; तोंड वर करून काय निघून गेला एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तिकडं साहेबांच्या कंठाशी घुटमळत असलेला प्राण काय सुटला इकडं इतके दिवस शिवसैनिकांनी रोखून धरलेल्या हंबरड्यालाही कंठ फुटला... आमचे साहेब गेले हो, आमचे साहेब गेले!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेनेची कमान

बाळासाहेब जरी शरीरानं निघून गेले असले तरी त्यांच्या विचारांनी ते शिवसैनिकांच्या मनामनात आजही जिवंत आहेत. आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात बाळासाहेब म्हणाले होते,'उद्धव,आदित्यला सांभाळा!' शिवसैनिकांनी बाळासाहेबांचा हा शब्द शिरसावंद्य मानला आणि शिवसेनेचा भगवा उद्धव ठाकरेंच्या हाती दिला. बाळासाहेब तर गेले आता पुढं काय? शिवसेनेचं कसं होणार? अशा प्रतिक्रिया जनमानसात उमटत असतानाच तमाम शिवसैनिकांच्या ओठी एकच नाव प्रगटलं... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे! बाळासाहेबांचा वसा आणि वारसा लाभलेल्या उद्धव ठाकरेंवर शिवसेनेनं 2003 मध्ये कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. 2004 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. बाळासाहेबांच्या जाण्यानं शोकसागरात बुडालेल्या शिवसैनिकांना उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे पुढं सरसावले. शिवसेना म्हणजे एक सुसंघटित पक्ष अशी नवीन ओळख करून देण्यात ते यशस्वी झाले.

आपल्या संयमी नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी शिवसेना वाढवली, जपली, जोपासली. शिवसेनाप्रमुख ही दैवी संज्ञा केवळ आणि केवळ बाळासाहेबांनाच शोभून दिसते, असं म्हणत शिवसेनाप्रमुख हे पद बाळासाहेबांच्या नावापुढं कायम ठेवत शिवसेनेच्या ठरावानुसार पक्षासाठी शिवसेना पक्षप्रमुख हे पद स्वीकारलं आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता शिवसेनेचे तब्बल 63 वाघ आमदार म्हणून विधानसभेवर पाठवले. पुढं 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत युती करून 56 आमदार निवडून आणण्याची किमया साधली, पण सत्तावाटप करण्यात वाद निर्माण झाला, युती तुटली आणि इथूनच शिवसेनाफुटीची बीजं पेरली गेली. युती तुटल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणानं एकामागून एक अशी धक्कादायक वळणं घ्यायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि... ‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…’ असं म्हणत शिवाजी पार्कच्या मैदानावर महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ठाकरे घराण्यातला पहिला आमदार म्हणून निवडून विधानसभेवर गेलेले उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री बनले. 14 मे 2020 रोजी उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेऊन राज्याचा गाडा हाकायला जोमानं सुरुवात केली, मात्र त्यांच्या कार्यकाळात राज्यात कोरोनानं हात पसरायला सुरुवात केली पण न डगमगता, न घाबरता उद्धव ठाकरेंनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या साथीनं या कोरोनाशी दोन हात केले. कोरोनाशी यशस्वी लढाई लढून थोडा मोकळा श्वास घेत नाहीत तोच उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर भलं मोठं संकट कोसळलं. 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या काही समर्थक आमदारांसह बंड केलं आणि शिवसेनेचं घर फुटलं. ते म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. पाहता पाहता 40 आमदार आणि 12 खासदार शिंदेंना जाऊन मिळाले. आघाडी सरकार अल्पमतात गेल्यानं 29 जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेत पडलेली फूट भाजपच्या पथ्यावर पडली आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करीत भाजपनं राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेनेत पडलेली फूट पाहून कडवट शिवसैनिक विव्हळला, चिडला, रस्त्यावर उतरला, पण खचेल तो शिवसैनिक कसला? 'उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,' असं म्हणत शिवसैनिक पुन्हा एकदा एकवटला आणि शिवसेना कुणाची ? हा वाद कोर्टात पोहोचला.

... आणि ठाकरेंची शिवसेना शिंदेंची झाली

तोपर्यंत तिकडं निवडणूक आयोगाचा निकाल आला. 17 फेब्रुवारी 2023 रोजी शिंदे गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता मिळाली. इतकंच नव्हे, तर आजवर विरोधकांच्या छाताडात घुसून त्यांना पुरतं घायाळ करणारा शिवसेनेचा आत्मा म्हणजेच धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे गटाला मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या हाती मशाल आली. 12 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टाचाही निकाल आला. शिंदे गटाकडून भरत गोगावले यांची प्रतोदपदी करण्यात आलेली नियुक्ती सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर ठरवत आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभाध्यक्षांनी निर्णय द्यावा, असा आदेश दिला. अखेर नववर्षातील 10 जानेवारी हा निकालाचा दिवस उजाडला. कोण पात्र? कोण अपात्र? या निकालाची साऱ्या देशाला उत्सुकता लागली असतानाच विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 'सगळेच पात्र' असं म्हणत शिंदे गट हीच खरी शिवसेना असा निकाल दिला. सुप्रीम कोर्ट झालं, निवडणूक आयोग झाला, विधानभवन झालं पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हाती वारंवार निराशा आली. मग मात्र ठाकरे गटानं थेट जनता न्यायालय भरवलं आणि शिवसेना आमचीच हे सप्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची चिरफाड केली.

आता पुढं काय?

बाळासाहेब एकदा माँसाहेबांना म्हणाले होते, "बाहेर कुठं वादळ सुरू असेल तर आपण शांत राहायचं असतं आणि बाहेर जर का शांतता पसरली असेल तर आपण वादळ निर्माण करायचं असतं!" सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर आज महाराष्ट्रात शांतता पसरलीय. त्यामुळं बाळासाहेबांनी म्हटल्याप्रमाणं आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रात वादळ निर्माण करणार का? आणि शिवसैनिकांच्या साथीनं वादळासारखं घोंगावत शिवसेना आमचीच हे येत्या निवडणुकांच्या निकालातून दाखवून देणार का? अर्थात, शिवसेना कुणाची याचा निकाल आता जनता जनार्दनच लावणार हे नक्की!

Edited by: Mangesh Mahale

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT