लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या ताफ्याने काल (ता.3) आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकरी (Farmers) आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्याही कागदपत्रांविना आपल्याला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लखनौपासून 90 किलोमीटर अंतरावरील सीतापूर येथील विश्रामगृहात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. याचा व्हिडीओही प्रियांका गांधी यांच्या टीमने प्रसिद्ध केला आहे. स्थानबद्ध करण्यात आल्यानंतर प्रियांका गांधींनी हाती झाडू घेऊन त्यांची खोली साफ केली. ही माझी खोली असून, ती मी स्वच्छ ठेवणार, असे त्या म्हणाल्या.
मला येथून सोडल्यानंतर मी लखीमपूर खीरीतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसण्यासाठी जाणार आहे. मला केवळ त्यांच्या दु:खात सहभागी व्हायचे आहे. दरम्यान, काल रात्री प्रियांका गांधी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यांना अडवणाऱ्या पोलिसांकडे त्यांनी अटक वॉरंट दाखवण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी घटनास्थळी आपण उपस्थितच नव्हतो, असा दावा केला आहे. मी आणि माझा मुलगा आशिष मिश्रा घटनास्थळी नव्हतो. याचे पुरावे म्हणून माझ्याकडे फोटो आणि व्हिडीओ आहेत, असे मिश्रांनी म्हटले आहे. त्यांचे पुत्र आशिष मिश्रा म्हणाले की, माझ्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो. काही समाजकंटकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल होता. यात आमच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी मी बानबीरपूर येथे होतो. राजकारण करण्यासाठी माझ्आवर आरोप केले जात आहेत.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. काल लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकरी आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.
मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा काल दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.