Amarinder Singh and Gandhi Family  File Photo
ताज्या बातम्या

कॅप्टन अमरिंदरसिंगांनी आता थेट गांधी कुटुंबावरच डागली तोफ

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अनुभव नसून, दोघेही दिशाभूल झालेले आहेत, अशी टीका अमरिंदरसिंग यांनी केली आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग यांना हटवून त्यांच्या जागी चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना आणण्यात आले आहे. आता अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्यानंतर थेट गांधी कुटुंबावरच हल्लाबोल केला आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) हे दोघेही अनुभव नसलेले आणि दिशाभूल झालेले आहेत, अशी तोफ त्यांनी डागली आहे.

चरणजितसिंग चन्नी यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी हेही या शपथविधीला उपस्थित होते. त्यांनी चन्नी यांची निवड करत दोन गटांमध्ये विभागलेल्या पंजाब काँग्रेसमधील मतभेदांवर जालीम उपाय केल्याचे बोलले जात आहे. परंतु शपथविधीला अमरिंदरसिंग यांची दांडी मारली होती. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. यामुळे अमरिंदरसिंग हे काँग्रेस सोडतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता अमरिंदरसिंग थेट गांधी कुटुंबावरच हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अनुभव नसून, दोघेही दिशाभूल झालेले आहेत, अशी टीका अमरिंदरसिंग यांनी केली आहे. त्यामुळे अमरिंदरसिंग यांनी थेट गांधी कुटुंबावर निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते लवकरच काँग्रेस सोडतील, या शक्यतेला आता बळ मिळू लागले आहे.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. अमरिंदरसिंग म्हणाले होते की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन.

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. चन्नी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा अद्याप शपथविधी झालेला नाही. मंत्रिमंडळामध्येही सिध्दू यांचंच वर्चस्व असू शकतं, अशी चर्चा आहे. यामुळे अमरिंदरसिंग यांच्या नाराजीत भरच पडत आहे.

अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. नव्या चेहऱ्यांना संधी देताना सिध्दू यांच्या पारड्यात झुकतं माप टाकलं जाऊ शकतं. चन्नी हे स्वत: सिध्दू यांच्या गटातील मानले जात आहेत. पण तरीही अमरिंदरसिंग यांच्या जवळच्या नेत्यांमधील काहींना संधी दिली जाईल. अमरिंदरसिंग हे पंजाब काँग्रेसचे बडे नेते आहेत. त्यांना काँग्रेसकडून पूर्णपणे अडगळीत टाकणे राजकीयदृष्ट्या पक्षाला परवणारं नाही. त्यामुळं मंत्रिमंडळात त्यांच्या गटातील नेत्यांना बऱ्यापैकी स्थान मिळेल, असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT