Jitin Prasada 
ताज्या बातम्या

राज्यात मंत्रिपद मिळालेले माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, राजकारणात प्रमोशन, डिमोशन काही नसतं!

माजी केंद्रीय मंत्र्यांचे भाजपने डिमोशन केले, अशी टीका होत आहे. अखेर या टिकेला त्यांनी उत्तर दिले आहे.

सरकारनामा ब्युरो

लखनौ : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने (BJP) उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. यामध्ये सात नव्या मंत्र्यांना स्थान मिळाले. त्यापैकी एक मंत्रिपद काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांना मिळाले आहे. माजी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रसाद यांचे भाजपने डिमोशन केले, अशी टीका होत आहे. अखेर या टिकेला त्यांनी उत्तर दिले आहे.

प्रसाद यांना राज्यात मंत्री करण्यात आल्याने भाजपवर टीका होऊ लागली आहे. केंद्रात मंत्री असलेल्या व्यक्तीला राज्यात मंत्री केल्याची टीका होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. भाजपने जाती पाहून मंत्रिपदे वाटली, अशीही टीका केली जात आहे. सत्तेसाठी केंद्रात मंत्रिपद भूषवलेले राज्यात आले, असेही काही जण म्हणत आहेत.

यावर अखेर 47 वर्षीय प्रसाद यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रमोशन आणि डिमोशन असे काही नसते. महत्वाचे म्हणजे जनतेची सेवा करण्याची संधी आणि जबाबदारी मिळणे गरजेचे आहे. अशी संधी दिल्याबद्दल भाजप नेतृत्व आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि मुख्य योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो.

शपथविधी झालेल्या सर्व मंत्र्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना अद्याप कोणत्याही खात्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात निवडणुका होत असून, आचारसंहिता लागू होण्यास केवळ तीन महिने राहिले आहेत. त्याआधी या मंत्र्यांना खातेवाटप करावे लागेल अन्यथा हे मंत्री बिनखात्याचेच राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल (ता.26) झाला. या विस्तारात सात नव्या मंत्र्याना स्थान मिळाले आहे. यात प्रसाद हे एकमेव कॅबिनेट मंत्री असून, राज्यमंत्री संगीता बलवंत बिंड, पलटूराम, संजीवकुमार गौर, दिनेश खाटिक, छत्रपाल गंगवार आणि धर्मवीर प्रजापती यांचा समावेश आहे. यातील गंगवार, प्रजापती आणि बिंड हे ओबीसी समाजातील आहेत. खाटिक आणि पलटूराम हे अनुसूचित जातीतील तर गौर हे अनुसूचित जमातीतील आहेत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीय समीकरणे साधण्यावर भाजपने भर दिला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात प्रसाद हेच एकमेव ब्राह्मण मंत्री आहे. उत्तर प्रदेशातील ब्राम्हण चेहरा म्हणून प्रसाद यांची ओळख आहे. ते माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. या वर्षी जून महिन्यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तीन महिन्यांतच त्यांना योगी सरकारमध्ये मंत्री बनवले आहे. भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक, गुजरात व उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही बदलण्याची चर्चा सुरू होती. पण पक्षश्रेष्ठीनं पुन्हा एकदा योगी यांच्यावरच विश्वास दाखवत केवळ मंत्रिमंडळ विस्तार कऱण्याचा निर्णय घेतला. आगामी निवडणुका योगींच्याच नेतृत्वाखाली लढण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT