Priyanka Tibrewal 
ताज्या बातम्या

पराभूत झालेल्या भाजप उमेदवारानं स्वत:लाच घोषित केलं...

भाजपने प्रियांका टिबरेवाल यांना अतिशय प्रतिष्ठेच्या लढतीत उतरवले होते. अखेर त्यांचा दारूण पराभव झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhabanipur) मतदारसंघातून विक्रमी ५८ हजार ८३२ मतांनी विजयी झाल्या आहेत. ममतांच्या विरोधात भाजपने (BJP) प्रियांका टिबरेवाल (Priyanka Tibrewal) यांना उतरवले होते. अखेर त्यांचा दारूण पराभव झाला आहे. तरीही हरल्यानंतर त्यांनी स्वत:लाच 'मॅन ऑफ द मॅच' घोषित केले आहे.

पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. भवानीपूरसह समशेरपूर आणि जांगीपूर या मतदारसंघात तृणमूलने विजय मिळवला आहे. पराभव झाल्यानंतर प्रियांका टिबरेवाल म्हणाल्या की, या खेळातील मॅन ऑफ द मॅच मीच आहे. ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात मी उभी राहिले आणि २५ हजारांहून अधिक मते मिळवली. मी यापुढेही कठोर परिश्रम करीत राहीन.

मी माझा पराभव मोकळ्या मनाने मान्य करते. मी या निकालाविरोधात न्यायालयात जाणार नाही. परंतु, काही जण म्हणत होते की ममतांचा १ लाख मतांनी विजय होणार. प्रत्यक्षात त्या सुमारे ५० हजार मतांनी जिंकल्या आहेत. याबद्दल ममतांचे अभिनंदन परंतु, त्यांनी कशा प्रकारे निवडणूक जिंकली ते सगळ्यांनीच पाहिले आहे, असेही टिबरेवाल म्हणाल्या.

पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगलाच भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना तेथे पराभव पत्करावा लागला होते. त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रिपद टिकवावे लागणार होते. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली होती. भाजपने भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली होती. आता ममतांनी विजय मिळवून त्यांचे मुख्यमंत्रिपद सुरक्षित केले आहे.

प्रियांका टिबरेवाल या मागील विधानसभा निवडणुकीत एंटली मतदारसंघात भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांचा त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. याचबरोबर कोलकता महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत टिबरेवाल या तृणमूलच्या स्वपन सम्मादार यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. नंतर 2020 मध्ये त्यांची भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बनवण्यात आले होते. आताही त्यांच्या पदरी पराभवच आला आहे.

भाजपला ममतांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा होता परंतु, अनेक नेत्यांना यास नकार दिला होता. डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीने बडे भाजप नेते ममतांच्या विरोधात मैदानात उतरण्यास तयार नव्हते. राज्यात तृणमूलच्या विजयानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी कोलकता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये टिबरेवाल यांचा समावेश आहे. याच याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT