ShivBhojan Thali 
ताज्या बातम्या

अडीच कोटी गरजूंची भूक भागवणारी मोफत शिवभोजन थाळी बंद होणार

राज्य सरकारने 15 एप्रिलपासून मोफत शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरू केला होता.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोरोना काळात गरजुंसाठी ठाकरे सरकारकडून शिवभोजन थाळी मोफत दिली जात आहे. पण आता या थाळीसाठी एक ऑक्टोबरपासून पूर्वीप्रमाणेच दहा रुपये मोजावे लागणार आहे. राज्यात मागील 168 दिवसांमध्ये दोन कोटी 64 लाख 76 हजार 319 जणांना मोफत थाळी देण्यात आली आहे. या अन्नछत्राची सांगता 30 सप्टेंबर रोजी होणार आहे.

कोरोना संकटाने अनेकांचा रोजगार हिरावून घेतला. हाताला काम नसल्यानं रोजचं जगणंही मुश्किल झालं होतं. अशा गरजुंसाठी राज्य सरकारने 15 एप्रिलपासून मोफत शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरू केला होता. सुरूवातीपासूनच या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे या योजनेचा कालावधी दर महिन्याला वाढवण्यात आला. आता साडे पाच महिन्यांनंतर मोफत योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात एक हजार 320 केंद्रांमधून शिवभोजन थाळी दिली जाते. यापुढे 1 ऑक्टोबरपासून या थाळीसाठी पूर्वीप्रमाणे दहा रुपये मोजावे लागणार आहेत. सुमारे 168 दिवसांच्या या अन्नछत्रात दोन कोटी 64 लाख 76 हजार 319 जणांना दुपारचे जेवण मोफत दिले गेले. त्यासाठी राज्य सरकारला शंभर कोटींहून अधिक खर्च करावा लागला आहे. राज्यातील केंद्रामधून सुरू असलेली पार्सल सेवाही एक ऑक्टोबरपासून बंद केली जाणार आहे. केंद्रात बसूनच थाळी खाणे बंधनकारक असेल.

मागील वर्षी प्रजासत्ताक दिनापासून संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार ‘भुकेलेल्यांना अन्न’ देणारी शिवभोजन थाळीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. दहा रुपयांच्या या थाळीसाठी ग्रामीण भागामध्ये 30 रुपये तर शहरी भागात 45 रुपयांचे अनुदान दिले जाते. महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढू लागल्यानंतर पहिल्या लाटेपासून गरजुंना याचा अधिकाधिक लाभ घेता यावा यासाठी थाळीसाठी पाच रुपये मोजावे लागत होते.

दुसऱ्या लाटेत ही थाळी मोफत देण्यास सुरूवात झाली. मोफत थाळी झाल्यानंतर एक लाखांवरून ही संख्या प्रत्येक दिवशी एक लाख ९० हजारांवर गेली आहे. नाशिक, रायगड या जिल्ह्यामंध्ये दररोज 14 ते 25 हजार लोक मोफत थाळीचा लाभ घेतात. इतर जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण सरासरी पाच हजार एवढे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT