Covishield  File Photo
ताज्या बातम्या

कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी पण..फक्त पैसे देऊन लस घेणाऱ्यांसाठी

केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवले होते. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर हे अंतर कमी करण्यात येईल.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid19) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड (Covishield) लशीच्या दोन डोसमधील (Dose) अंतर वाढवले होते. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर हे अंतर कमी करण्यात येईल. परंतु, पैसे देऊन खासगी ठिकाणी लस घेणाऱ्यांसाठी हे अंतर कमी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यात येणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सरकार हा निर्णय घेणार आहे. परंतु, केवळ खासगी ठिकाणी पैसे घेऊन कोव्हिशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी हे अंतर कमी केले जाईल. खासगी रुग्णालये आणि दवाखाने त्यांच्याकडे कोव्हिशिल्ड लस घेणाऱ्या नागरिकांना चार आठवड्यांत दुसरा डोस देऊ शकतात. सध्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे आहे.

या महिन्याच्या सुरवातीला केरळच्या उच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिला होता. पैसे देऊन कोव्हिशिल्ड लस घेणाऱ्या नागरिकांसाठी दोन डोसमधील अंतर कमी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. आता न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सरकारने या दिशेने पावले उचलली आहेत. परंतु, सरकारी ठिकाणी कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांसाठी दोन डोसमधील अंतर 12 आठवडेच राहील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

कोरोना लसीकरण जानेवारीत सुरू झाले त्यावेळी कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर सुरवातीला 4 ते 6 आठवडे होते. नंतर हे अंतर 6 ते 8 आठवडे करण्यात आले होते. केंद्र सरकारने मे महिन्यात हे अंतर 12 ते 16 आठवडे केले. सरकारने हे अंतर वाढवल्याचा संबंध लशीच्या टंचाईशी जोडला जात होता. अंतर वाढवण्यामागील शास्त्रीय कारणांची विचारणाही केली जात होती. लसीकरणविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीतील काही सदस्यांनीही सरकारने याबाबत विश्वासात घेतले नव्हते, अशी टीका केली होती. यामुळे कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारकडून कमी केले जाईल, अशी चर्चा होती.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे. आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT