Kapil Sibal File Photo
ताज्या बातम्या

दुखणं पंजाबात अन् सिब्बलांनी सांगितला दिल्लीतला जालीम उपाय

काँग्रेसमधील बंडखोरांच्या जी-23 गटाचे नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला यावर जालीम उपाय सांगितला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सिध्दूंपाठोपाठ एका कॅबिनेट मंत्र्यांसह चार पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत. हे राजीनामासत्र सुरू असतानाचा काँग्रेसमधील बंडखोरांच्या जी-23 (G-23) गटाचे नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षाला यावर जालीम उपाय सांगितला आहे.

पंजाबमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असून, यातून मार्ग काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तातडीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. पक्षाचे प्रभारी हरीश चौधरी तातडीने पंजाबमध्ये दाखल झाले आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सिद्धू यांच्याशी चर्चा केली आहे. चन्नी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेतली. यानंतर बोलताना त्यांनी या वादातून लवकरच मार्ग निघेल, असे संकेत दिले आहेत.

यावरुन काँग्रेसमधील फेरबदलांसाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणारा जी-23 हा बंडखोरांचा गट पुन्हा सक्रिय झाला आहे. या गटातील नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला अध्यक्ष नसल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसला सध्या निडलेला अध्यक्षच नाही. मग निर्णय कोण घेतेय हेच आम्हाला कळत नाही. लोक पक्ष सोडून का जात आहेत? आपणच आता आपली चूक पाहायला हवी. तातडीने काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक बोलावावी. पक्षाच्या स्थितीवर चर्चा ही व्हायलाच हवी. आम्ही पक्षाची विचारधारा सोडून कुठेही जाणार नाही. काँग्रेसचे दुर्दैव म्हणजे नेतृत्वाच्या जवळचे नेते पक्ष सोडून जात आहेत आणि नेतृत्वाच्या जवळ नसलेले तर पक्षात कायम आहेत.

दरम्यान, सिद्धू यांनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिला आहे. यामुळे काँग्रेस नेतृत्वाने प्लॅन बी तयार ठेवला आहे. सिद्धूंच्या मागे जाऊन फरफट करून घेण्याची पक्ष नेतृत्वाची इच्छा नाही. यामुळे पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी दुसरा नेता नेमणार आहे. यासाठी आमदार कुलजितसिंग नागरा आणि पक्षाचे खासदार रवनीतसिंग बिट्टू या दोघांची नावे चर्चेत आहेत. काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपला असून, सिद्धू यांच्यावर आता विश्वास ठेवण्याची जोखीम नेतृत्व स्वीकारणार नाही. त्यांनी अचानक राजीनामा देऊन नेतृत्वालाच तोंडघशी पाडले आहे. यामुळे सिद्धूंच्या जागी या दोनपैकी एका नेत्याची निवड निश्चित मानली जात आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT