B.S.Yediyurappa  
ताज्या बातम्या

राज्याचं चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं अन् अखेर आमदार म्हणून झाला गौरव

कर्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. येडियुरप्पांच्या योगदानाचा आता भाजपने (BJP) गौरव केला आहे. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या येडियुरप्पांना उत्कृष्ट आमदाराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कर्नाटक विधानसभेने उत्कृष्ट आमदार पुरस्कार या वर्षीपासून सुरू केला आहे. या पुरस्काराचा पहिला मान येडियुरप्पांना मिळाला आहे. राजकारणातील त्यांची प्रदीर्घ कारकिर्द आणि सभागृहातील उत्कृष्ट कामगिरी या आधारावर हा पुरस्कार देण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेल्या सूचनेनुसार हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ओम बिर्ला हे कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाला हजर होते.

या वेळी बोलताना विधानसभेचे अध्यक्ष विश्वेवर हेगडे कागेरी म्हणाले की, लोकसभा आणि राज्यसभेतील उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराप्रमाणे कर्नाटकात यावर्षीपासून आम्ही उत्कृष्ट आमदार पुरस्कार सुरू करीत आहोत. येडियुरप्पा हे आमदार आहेत. ते विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीही होते.

राज्याचे चारवेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या येडियुरप्पांचा भाजपने आता आमदार गौरव केला आहे. येडियुरप्पांनी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ते 1983 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. ते लोकसभेवरही निवडून गेले होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे केवळ आमदार म्हणून काम करीत आहेत. त्यांच्यावर पक्षाने अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.

मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर येडियुरप्पांनी पहिल्यांदाच विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी लावली होती. विधानसभेत येडियुरप्पा हे शेवटच्या बाकावर बसल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अखेरीस खुद्द येडियुरप्पांनीच स्वत: शेवटच्या बाकावरील जागा मागून घेतल्याचे समोर आले. येडियुरप्पा यांच्या शेजारी शेवटच्या बाकावर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे बसले होते.

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मोठा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर आहे. येडियुरप्पांना त्यांचे पुत्र व पक्षाचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांच्यामुळे राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा होती. तसेच, विजयेंद्र यांना नव्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले नव्हते. येडियुरप्पांनी आग्रह धरूनही नेतृत्वाने विजयेंद्र यांना डावलले होते. यामुळे येडियुरप्पा नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT