नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर शहरालगतच्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी भाजपचे शहर उपाध्यक्ष अतुल कासट यांच्यासह त्यांचे भाऊ आणि चौघा मित्रांना मारहाण केली. शनिवारी रात्री हा प्रकार झाला. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या गुंडागर्दीविरोधात आज संगमनेरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी प्रांताधिकारी यांना निवेदन देत करण्यात आली. या मोर्चात आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ देखील सहभागी झाले होते. पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत मोर्चातून संताप व्यक्त करण्यात आला.
वाल्मिक कराड पुणे सीआयडीसमोर स्वतःहून सरेंडर झाला आहे. त्याला आता न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी त्याला सर्वसामान्य आरोपींप्रमाणे वागणून द्यावी. व्हीआयपी वागणूक देऊ नये, अशी मागणी अखंड मराठा समाज-जरांगे पाटील यांच्या मराठा सेवकांनी केली आहे. मराठा सेवकांनी बीड पोलिसांची भेट घेतली. पोलिस प्रशासनावर आमचा विश्वास दाखवत, वरील मागणी केली. बीडच्या पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एसआरपीएफचा बंदोबस्त वाढवला आहे.
बीड (BEED) ल्ह्यातील मस्साजोग गावचे ग्रामस्थं उद्या बुधवारी सकाळी दहा वाजता जलसमाधी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची माहिती देण्यासाठी गावात दवंडी देण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील पसार तीन आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. गावकऱ्यांनी उद्याच्या जलसमाधी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड सरेंडर झाला आहे. त्यामुळे मस्साजोग गावात भीतीचे वातावरण आहे. कुटुंबियांना आणि गावाला पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी बीड पोलिस अधीक्षकांकडे केल्याची माहिती मयत संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली.
वाल्मिक कराड हा आज दुपारी पुणे सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर त्याला केजमध्ये दाखल खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. सीआयडीचे पथक त्याला आजच न्यायालयासमोर हजर करणार आहे. न्यायालयात सुनावणीसाठी त्याला आज रात्री साडेसात वाजताच्या पुढे हजर केले जाणार आहे. यासाठी सीआयडीने न्यायालयाला वेळेची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याची माहिती पुढे आली. वाल्मिक कराडच्या रिमांडवर आजचं केज जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराड याला रात्री साडेसात वाजल्यानंतर न्यायालयासमोर सीआयडीचे पथक हजर करणार आहे. आता या प्रकरणी नेमकी काय सुनावणी होते, याकडे लक्ष लागले आहे.
माजी मंत्री बच्चू कडू आणि भाजपचे (BJP) आमदार प्रवीण तायडे यांच्यात अचलपूर मतदारसंघात संघर्ष पेटला आहे. भाजप आमदार तायडे यांनी बच्चू कडू यांच्याविषयी विधान केले. त्यामुळे बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावतीचे पोलिस अधीक्षकांची भेट घेत आमदार तायडेंवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंच्या नादाला न लागता पहिले प्रहारच्या कार्यकर्त्यांचा सामना करून दाखवावा, असे आव्हान देखील प्रहारचे जिल्हाध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी दिला. अमरावतीच्या बहिरम येथे सध्या बहिरम बाबांची यात्रा सुरू असून, तिथं भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे शुभेच्छा फलक फाडण्यात आले. यामुळे भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. अचलपूर मतदारसंघात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंना पराभूत करत प्रवीण तायडे हे निवडून आलेले आहेत.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संतोष देशमुख हत्याकांड गंभीरच असून, आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली. मात्र या प्रकरणात राजकारण जास्त होत आहे. पोलिसांना तपास करू द्या. राजकारणीच पोलिस बनतात, अशा शब्दात तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड याच्या सरेंडरनंतर राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर कडाडल्या आहेत. संतोष देशमुख हत्याकांडात असणार्या आरोपींना शिक्षा होईलच. मात्र या प्रकरणात दुःख कमी, राजकारण जास्त केलं जातं आहे. त्यामुळे राज्यातल्या इतर घटनांकडे दुर्लक्ष होत आहे. बीड जिल्ह्यातल्या राजकारणातून बाजूला करण्यासाठी की, धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत गेल्याने, धनंजय मुंडेंना नामोहरण केलं जात आहे, असा संशय देखील तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला.
पुणे (PUNE) आयडीसमोर सरेंडर झालेला वाल्मिक कराड हा पुण्यात किती दिवस होता, याची माहिती एका कार्यकर्त्याने दिली. वाल्मिक कराड हा तीन दिवसांपासून पुण्यात होता, असा दावा त्याच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आम्ही अक्कलकोटवरून आलो असल्याचेही त्याने म्हटले. वाल्मिक कराडवर खोटे आरोप करण्यात आले असून, स्वतःहून पुणे सीआयडी कार्यालयात हजर झाले. खोट्या आरोपांमुळे ते घाबरले असतील म्हणून ते बीड पोलिसांसमोर आले नसतील, असेही या कार्यकर्त्याने म्हटले आहे. हा कार्यकर्ता नगरसेवक आहे. वाल्मिक कराडचा शोध घेणाऱ्या पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वाल्मिक कराड याने सरेंडर करण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओवर काँग्रेस (Congress) नेते आमदार विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले आहेत. ते म्हणाले, "या वाल्मिक कराडची हिंमत तर इतकी की सरेंडर होण्यापूर्वी व्हिडिओ रिलीज करतो. स्वतःला क्लिनचीट देतो. यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट होते". या प्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवले आहे ते पाहता पोलिस, सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी केली पाहिजे, आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे, म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही!, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने कोणत्याही दबावाशिवाय करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. या प्रकरणात सुरवातीपासून दिरंगाई झालेली आहे. महाराष्ट्राचे पोलिस सक्षम असताना या प्रकरणातील आरोपींना पकडता आले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात 'दूध का दूध, पानी का पानी' व्हावे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाईंडचा ठपका असलेल्या वाल्मिक कराड याने मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वत:ला सरेंडर केले. वाल्मिक कराड हा सीआयडीच्या कार्यालयात एमएच 23 BG 2231 क्रमांकाच्या पांढऱ्या स्कॉर्पिओमधून पोचला. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत दोन व्यक्ती होत्या. यापैकी एका व्यक्तीने वाल्मिक कराड हा आणि आम्ही आता देवावरुन आलो, आम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरातून इकडे आलो. पण आठ दिवस वाल्मिक कराड कुठे होते, माहिती नाही. वाल्मिक कराड मला अक्ककोटच्या मंदिरात भेटले, असे सांगितले.
वाल्मिक कराडने पुण्यात CID कडे आत्मसमर्पण केल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. छत्रपती संभाजीराजे तातडीची पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची व धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्याने महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडाली होती. तब्बल 22 दिवसांनंतर आज वाल्मिक कराड CIDला समोर शरण आले आहेत. त्यानंतर या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी कराड हे जर निर्दोष आहेत. तर त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी शरण यायला पाहीजे होते. एवढा वेळ का लावला, असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.
वाल्मीक कराडचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी तो फोटो त्यांच्या सोशल मीडिया शेअर करत,"व्वा! क्या सीन है?? नक्की कोण कुणाचा आका? ", अशी जहरी टीका केली आहे.
अतिरिक्त महासंचालक प्रशांत बोरूडें यांच्याकडून गेल्या दीड तासापासून वाल्मिक कराड यांची चौकशी.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराड सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पणानंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
"आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे हीच मागमी आहे. पोलिस यंत्रणा काम करतेय मग इतका वेळ का लागतोय?. गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय का?. आरोपींना पकडायला इतका वेळ का लागतोय? मग, आम्हाला न्याय कसा आणि कधी मिळणार? असा प्रश्न वैभवी देशमुखने विचारले आहेत.
राज्यात गेली 15 दिवस एकच खळबळ उडवणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराड सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता.
भाजप आमदार सुरेश धस घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांचा आरोप 3 आठवडे उलटूनही वाल्मिक कराड अद्याप फरार. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नेमणूक करण्याचीही मागणी करण्यासाठी धस आज दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.