दामोह : लाच घेण्यात गैर नाही, लाख रुपयांमागे हजार-पाचशे घ्यावेत, हा सल्ला हा एका महिला आमदाराचा आहे. त्यांनी उघडउघड लाचखोरीचे (Bribe) समर्थन केले आहे. यामुळे आमदार रमाबाई गोविंदसिंह परिहार (MLA Rambai Parihar) या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पिठामध्ये मीठ असते त्याप्रमाणे लाच आहे, असा जावईशोधही त्यांनी लावला आहे.
मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यातील पथरिया विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाच्या (बसप) रामबाई या आमदार आहेत. त्यांच्या कामाच्या वेगळ्या शैलीमुळे त्या अनेक वेळा चर्चेत असतात. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फैलावर घेण्याचे प्रकार वारंवार त्यांच्याकडून सुरू असतात. मात्र, जनतेच्या सेवेसाठी त्या अशा प्रकारे वागतात, असे समर्थन त्या करीत असतात. आता त्यांनी लाचखोरीचे जाहीरपणे समर्थन केले आहे.
आमदार रामबाई यांच्याकडे नागरिकांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीबाबत तक्रार केली होती. यावर रामबाई यांनी कारवाई करण्याऐवजी पंचायत कर्मचाऱ्यांना लाचखोरीचे गणित समजावून सांगितले. त्या म्हणाल्या की, एक हजार रुपयांपर्यंत लाच घेण्यात काही वाईट नाही. पिठातील मिठाप्रमाणे चालखोरी चालते. हजार-पाचशेची लाच घेणे मी समजू शकते. परंतु, 10 हजार रूपयांची लाच घेणे चुकीचे आहे.
पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांनी हजारो रुपयांची लाच घेतली जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली. यावर आमदार रामबाई म्हणाल्या की, तुम्ही गरीबांकडून एवढी रक्कम घेऊ नका. सव्वा लाखाच्या घरासाठी 5 ते 10 हजार रुपये लाच घेऊ नका. तुमच्या घरात 1 लाखांचे बाथरूम असते. परंतु, गरीबाचे तेवढ्या पैशात घर होते. त्याच्याकडून सव्वा लाखाला हजार-पाचशे रुपये घ्या.
दरम्यान, आमदार रामबाई यांना अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. अखेर मागील वर्षी त्यांनी दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. यात त्या केवळ एका विषयांत नापास झाल्या होत्या. त्या विज्ञान विषयांत एका गुणाने नापास झाल्या होत्या. रामबाईंना शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा त्यांच्या मुलीपासून मिळाली. त्यांची मुलगी शिक्षिका आहे. याबद्दल बोलताना रामबाई म्हणाल्या होत्या की, मला केवळ एका विषयात पास होण्यासाठी एक गुण कमी पडला आहे. माझ्या मुलीपासून मला शिक्षणाची प्रेरणा मिळाली हे माझ्यासाठी महत्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.