Narendra Modi  File Photo
ताज्या बातम्या

मोदी सरकार देणार आणखी एक धक्का! एलपीजी सबसिडी होणार बंद

चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 190 रुपयांची वाढ झाली आहे. आता मोदी सरकारने एलपीजी सबसिडी बंद करण्याची तयारी सुरू केली आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात वाढ होत आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 190 रुपयांची वाढ झाली आहे. आता मोदी सरकारने एलपीजी सबसिडी (Subsidy) काही ठिकाणी बंद केली असून, ती पूर्णपणे बंद करण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत असताना सबसिडी मिळत नसल्याची तक्रार नागरिक करू लागले आहेत. मे महिन्यापासून सरकारने अनेक ठिकाणी सबसिडी देणे बंद केले आहे. काही महिन्यांपूर्वी 15 राज्यांतील निवडक जिल्ह्यांमध्ये सबसिडी दिली जात होती. आता केवळ 8 राज्ये आणि लडाख, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे यासारखे केंद्रशासित प्रदेश आणि ईशान्येतील काही राज्यांमध्ये सबसिडी दिली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी बंद करण्याचा विचार करीत आहे. नागरिक एलपीजी सिलिंडरसाठी 1 हजार रुपये देण्यास तयार आहेत, असे सरकारने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. यामुळे सरकारसमोर आता दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे सबसिडी पूर्णपणे बंद करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे निवडक वर्गातील ग्राहकांनाच सबसिडी देणे. दुसरा पर्याय सरकारने स्वीकारल्यास केवळ उज्वला योजनेतील लाभार्थ्यांनाच सबसिडी मिळेल.

विनाअंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात या महिन्यात 25 रुपये वाढ करण्यात आली. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत आता 884.50 रुपयांवर गेली आहे. देशातील महानगरांमध्ये एलपीजी सिलिंडरची सर्वांत जास्त किंमत कोलकत्यात आहे. कोलकत्यात एलपीजी सिलिंडर 911 रुपयांना आहे. त्याखालोखाल चेन्नईत एलपीजी सिलिंडरची किंमत आता 900.5 रूपये आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आणखी चटके बसू लागले आहेत. सलग तीन महिने सिलिंडरच्या दरात सुमारे 25 रुपये वाढ करण्यात आली आहे.

देशात पेट्रोलआणि डिझेलच्यादरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. चालू वर्षातील आठ महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 190 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT