Navjot Singh Sidhu 
ताज्या बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! सिद्धूंचा प्रदेशाध्यपदाचा तडकाफडकी राजीनामा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग हे काँग्रेसला धक्का देणार असल्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.

सिद्धू यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा पाठवला आहे. तडजोड केल्यानंतर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास सुरू होते. मी पंजाबचे भविष्य आणि कल्याण यासोबत तडजोड करणार नाही. यामुळे पंजाब काँग्रेस प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस सेवा करीत राहीन, असे सिद्धू यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. यामुळे ते काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलली होती. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली होती. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले गेले. सिद्धू यांच्यासोबत चार कार्यकारी अध्यक्ष पक्षाने दिले होते.

अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चरणजितसिंग चन्नी यांनी नुकतीच पंजाब मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी हेही या शपथविधीला उपस्थित होते. त्यांनी चन्नी यांची निवड करत दोन गटांमध्ये विभागलेल्या पंजाब काँग्रेसमधील मतभेदांवर जालीम उपाय केल्याचे बोलले जात आहे. परंतु शपथविधीला अमरिंदरसिंग यांची दांडी मारली होती. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. यामुळे अमरिंदरसिंग हे काँग्रेस सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT