Razia Sultana File Photo
ताज्या बातम्या

मोठी बातमी : शपथ घेतल्यानंतर 48 तासांतच कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा

कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना यांनीही तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे खजिनदार गुलजार इंदर चहल यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला आहे.

रजिया सुलताना यांनी दोनच दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. सिद्घू यांनी राजीनामा देताच त्यांनीही राजीनामा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. सुलताना यांचे पती व माजी आयपीएस अधिकारी मोहम्मद मुस्तफा हे सिद्धूंचे सल्लागार आहेत. सुलताना यांनी म्हटले आहे की, सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने मीसुद्धा राजीनामा देत आहे. यापुढेही मी पक्षासाठी कार्य करीत राहीन. पंजाबच्या हितासाठी मी काम करेन. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे मी आभार मानते.

काँग्रेस खजिनदार चहल यांचाही राजीनामा

सिद्धू यांनी राजीनामा देताच तासाभरात काँग्रेसचे खजिनदार गुलजार इंदर चहल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे चहल यांची सातच दिवसांपूर्वी खजिनदारपदी निवड करण्यात आली होती. चहल हे लोकप्रिय पंजाबी अभिनेते व निर्माते आहेत. दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाने याची दखल घेऊन पक्षाचे प्रभारी आणि निरीक्षकांना तातडीने पंजाब काँग्रेसच्या स्थितीचा आढावा घेण्याचा निर्देश दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिद्धू यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दोन ओळीचा राजीनामा पाठवला आहे. तडजोड केल्यानंतर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास सुरू होते. मी पंजाबचे भविष्य आणि कल्याण यासोबत तडजोड करणार नाही. यामुळे पंजाब काँग्रेस प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस सेवा करीत राहीन, असे सिद्धू यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. यामुळे ते काँग्रेस सोडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलली होती. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली होती. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले गेले. सिद्धू यांच्यासोबत चार कार्यकारी अध्यक्ष पक्षाने दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT