Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu File Photo
ताज्या बातम्या

कॅप्टनची विकेट पाडून सिद्धू पुन्हा उतरणार सलामीला

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सिद्धू यांची भेट घेतली. यानंतर सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्यास राजी झाले आहेत.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सिध्दूंपाठोपाठ एका कॅबिनेट मंत्र्यांसह चार पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत. हे राजीनामासत्र सुरू असल्याने मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी सिद्धू यांची भेट घेतली. यानंतर सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्यास राजी झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री चन्नी हे सिद्धूंच्या मागण्या घेऊन दिल्लीत हाय कमांडची भेट घेणार आहेत.

पंजाबमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असून, यातून मार्ग काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तातडीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. पक्षाचे प्रभारी हरीश चौधरी तातडीने पंजाबमध्ये दाखल झाले आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सिद्धू यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सिद्धू यांनी काही निवडींना आक्षेप घेतला आहे. यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यानंतर सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्यास राजी झाले आहेत. असे असले तरी या वादात माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

सिद्धूंच्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री चन्नी हे आज दिल्लीत हाय कमांडची भेट घेणार आहेत. चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक महत्वाच्या निुयक्त्या केल्या होत्या. यातील काही नियुक्त्यांना सिद्धूंचा आक्षेप आहे. याचबरोबर मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाही त्यांचा विरोध आहे. दरम्यान, सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांनी भेटण्यापूर्वी ट्विट केले होते. त्यांनी म्हटले होते की, मुख्यमंत्र्यांनी मला चर्चेसाठी बोलावले आहे. आज दुपारी 3 वाजता आमची पंजाब भवनमध्ये भेट होत आहे. कोणत्याही चर्चेसाठी त्यांचे स्वागतच आहे.

सिद्धू यांचे सल्लागार मोहम्मद मुस्तफा यांनीही सिद्धू हे राजीनामा मागे घेतील याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले आहेत की, काँग्रेस नेतृत्वाच्या म्हणण्याच्या पलिकडे सिद्धू जाणार नाहीत. हे पक्ष नेतृत्वालाही माहिती आहे. ते काय अमरिंदरसिंग नाहीत. अमरिंदरसिंगांनी कधीच काँग्रेस आणि पक्ष नेतृत्वाचा विचार केला नाही. कधीकधी सिद्धू भावनेच्या भरात निर्णय घेतात.

सिध्दू यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याआधी कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना, खजिनदार गुलजार इंदर चहल व प्रशिक्षण विभागाचे सरचिटणीस गौतम सेठ यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सिध्दू यांच्या समर्थनार्थ या नेत्यांनी राजीनामे दिल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे. सिध्दू यांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काही नेते राजीनामे देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT