Hemant Soren | Arvind Kejriwal | Nitish Kumar Sarkarnama
देश

National Politics in 2024 : मोदींची हॅट्ट्रिक, केजरीवाल-सोरेन यांना अटक अन् नितीश कुमारांची पलटी; ‘या’ घडामोडींनी गाजले सरते वर्ष

2024 Political Highlights India: 2024 या वर्षात देशाने अनेक राजकीय घडामोडी अनुभवल्या. दिल्लीसह, हरियाणा, झारखंड इथल्या घडामोडी, आठ राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका, संसदेतला हंगामा अशांनी हे वर्ष चांगलेच गाजले. भाजपने मिळवलेली सत्तेची हॅटट्रिकही देशाने पाहीली.

Rajanand More

New Delhi: नव्या वर्षाची चाहुल लागत असताना 2024 मध्ये घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडी अवघ्या देशाने पाहिल्या. या वर्षांत घडलेल्या काही घटनांनी राजकारण हादरले, तर काही पक्षांना मोठे झटके बसले. भाजपसाठी हे वर्ष भरभराटीचे ठरले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तर देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला 50-50 संधी मिळाली. भाजपने सत्तेची हॅट्रिक मिळवताना विद्यमान मुख्यमंत्री तुरूंगात गेल्याची घटनाही देशात पहिल्यांदाच घडली. तर आठ राज्यांतील विधानसभा निवडणुकींनीही यंदाचे वर्ष गाजले.

2024 वर्ष सुरू झाले अन् देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. निवडणुकीची घोषणा होण्याआधी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राण-प्रतिष्ठापणेचा सोहळा पार पडला. त्याआधी मोदींनी देशभरातील अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. प्रामुख्याने या कालावधीत त्यांनी दक्षिण भारतावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. या माध्यमातून मोदींनी लोकसभा निवडणुकीसाठी शंखनाद केल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे होते.

नितीश कुमारांची पलटी

जानेवारी महिन्याच्या अखेरीस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी पलटी मारली. राष्ट्रीय जनता दलाचे साथ सोडत त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश केला आणि भाजपसोपत सत्ता स्थापन केली. त्याआधी त्यांनी विरोधकांना एकत्रित करत इंडिया आघाडीची पायाभरणी करण्यास सुरूवात केली होती. पण त्यांनी अचानक पलटी मारली अन् आघाडीचे घोडे अडले. पुढे काँग्रेसने पुढाकार घेत सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्याला बऱ्यापैकी यशही मिळाले.

हेमंत सोरेन यांना अटक

जानेवारी आणि फेब्रुवारी महिना झारखंडमध्ये राजकीय उलथा पालथ करणारा ठरला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जानेवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी ईडीने कथित भूखंड घोटाळाप्रकरणी अटक केली. त्याआधी त्यांना मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

‘अब की बार 400 पार’चा नारा

फेब्रुवारी महिन्यात मोदींनी सरकारच्या अखेरच्या अधिवेशनात ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला होता. पुढे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान हाच भाजपचा अजेंडा बनला होता. त्यानंतर 16 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा आणि चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आणि राजकीय पारा चढला.

केजरीवाल जेलमध्ये

मार्च महिन्याच्या अखेरीस राजधानी दिल्लीत भूकंप झाला. तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटक केली. देशात पहिल्यांदाच विद्यमान मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते. त्यामुळे या घटनेने देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

हे देखिल वाचा-

प्रचार, मतदान अन् आरोप-प्रत्यारोप

एप्रिल आणि मे महिना निवडणुकीच्या प्रचाराचा आणि मतदानाचा राहिला. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. लोकसभा आणि चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानही पार पडले. तसेच केजरीवालांनाही निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळाला होता.

भाजपची हॅटट्रिक

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा चार जूनला निकाल जाहीर झाला. यामध्ये एकट्या भाजपने 240 जागा आणि एनडीएने 293 जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली. तसेच आंध्र प्रदेश, ओरिसा आणि अरूणाचल प्रदेश या तीन राज्यांतही भाजपला झेंडा फडकला. काँग्रेसने लोकसभेत 99 जागा मिळवत मागील दहा वर्षांतील पीछेहाट भरून काढली. पण एकाही राज्यांत सत्ता मिळवता आली नाही.

सोरेन पुन्हा मुख्यमंत्री

जुलै महिन्यात हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाला आणि काही दिवसांतच त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चंपई सोरेन यांना पदाचा राजीनामा द्यावा लागल्याने ते नाराज झाले होते. त्यांनी ऑगस्ट महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. याच महिन्यांत हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या.

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र शासित प्रदेश बनल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका झाल्या. सप्टेंबर महिन्यात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल आला. यामध्ये हरियाणामध्ये पुन्हा भाजपनेच सत्ता काबीज केली. तर जम्मू-काश्मीर मध्ये इंडिया आघाडीने बाजी मारली. हरियाणात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाली. तर काश्मीर मध्ये दहा वर्षानंतर ओमर अब्दुल्ला पुन्हा मुख्यमंत्री बनले.

केजरीवालांचा राजीनामा, आतिशी मुख्यमंत्री

सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाकडून केजरीवालांना जामीन देण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि विश्वासू नेत्या आतिशी यांच्या गळ्यात या पदाची माळ टाकली. ही घटना दिल्लीच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. जवळपास सहा महिने केजरीवालांनी जेलमधून राज्याचा कारभार सांभाळला होता.

हे देखिल वाचा-

महाराष्ट्र, झारखंडमध्ये निवडणुकींचे बिगुल

ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. ऐन दिवाळीत प्रचार सुरू झाला. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेने तारले. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महायुतीने 288 पैकी तब्बल 237 जागा जिंकल्या. तर झारखंडमध्येही हेमंत सोरेन यांनी आपला दबदबा दाखवून दिला.

प्रियांका गांधी संसदेत

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या वर्षी पहिल्यांदाच संसदेत दाखल झाल्या. राहुल गांधी यांनी रायबरेलीतही विजय मिळाल्यानंतर वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिला होता. प्रियांका यांनी पोट निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे सध्या एकाच वेळी गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसदेत आहेत. सोनिया गांधी राज्यसभेच्या सदस्य असून राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत.

दिल्ली, बिहारमध्ये निवडणुकीचे वारे

दिल्ली आणि बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून नव्या वर्षात फेब्रुवारी-मार्च महिन्यांत या दोन राज्यांत निवडणूक होणार आहे. दिल्लीत आपने सर्व 70 जागांवर उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली आहे. केजरीवालांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. निवडणुकीआधी त्यांनी अनेक योजनाही जाहीर केल्या आहेत. बिहारमध्येही नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली एनडीए निवडणूक लढणार असल्याचे दिसते.

संसदेत हंगामा

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संविधानावर चर्चे वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या एका विधानामुळे मोठा गदारोळ झाला. काँग्रेसकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. संसदेच्या आवारात आंदोलन सुरू असताना भाजपचे दोन खासदार पडून जखमी झाले. या प्रकरणी राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी धक्का दिल्यानेच खासदार पडल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. तर काँग्रेसकडून अजूनही शाह यांच्या माफीनाम्याची मागणी केली जात असून देशभरात आंदोलन करण्यात आले.

एकूणच सरते २०१४ हे वर्ष राजकीय घडामोडींनी ठासून भरलेले होते, असेच म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT